शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा टाकून व्यावसायिक व्यवहारांबाबत त्यांच्या मुलाला अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतल्यानंतर राजकीय दबावतंत्रासाठी ईडीचा वापर करण्याचे दिल्लीतील भाजप सरकारचे तंत्र आता सर्वाना समजले असून बळाचा कितीही वापर केला तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.

ईडीचा वापर करून राज्यात सत्तांतर घडवता येईल अशी स्वप्ने पाहणारे मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे के वळ राजकीय प्रकरण आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी अन्वय नाईक मृत्यूच्या चौकशीची ठाम भूमिका घेतल्याने ज्यांच्या पोटात जळजळ सुरू झाली त्यांनी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला आहे. आम्ही शिवसेनेसाठी शहीद होऊ पण दडपशाहीसमोर गुडघे टेकणार नाही. शिवसेना सरनाईक यांच्या पाठीशी आहे. व्यवसायात काही त्रुटी असते तर चौकशी होऊ शकली असती. पण हा आणीबाणी लावण्याचा, लोकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. झुंडशाही आहे, असे संजय राऊत यांनी  स्पष्ट के ले.

छाप्यानंतर काही काळाने प्रताप सरनाईक यांनी प्रभादेवी येथे शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयात जाऊन संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. तर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी संस्थांचा गैरवापर केला जात आहे हे जनतेलाही समजते की सरनाईक यांच्यावरील कारवाई सूडाच्या भावनेतून झाली. ईडी के ंद्र सरकारच्या हाताचे बाहुले झाल्यासारखे काम करत आहेत. अशा कारवायांमुळे लढण्याचा आमचा निर्धार ठाम होत आहे, असे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

संघर्ष केल्यानेच कारवाई?

रायगडमधील व्यावसायिक अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त के ल्याच्या प्रकरणाचा तपास व्हावा हा मुद्दा प्रताप सरनाईक यांनी लावून धरला होता.

त्यामुळेच गोस्वामी यांना अटक झाली व त्या खटल्याचा तपास पुन्हा सुरू झाला. शिवाय भाजपबरोबर  असलेल्या मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांना फोडून त्यांचा शिवसेना प्रवेश करण्यात सरनाईक यांचा पुढाकार होता. त्यातूनच सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची भावना शिवसेनेच्या गोटात आहे.

ईडीने कारवाई का केली हे अद्याप आम्हालाच समजलेले नाही. माहिती घेऊन कायदेशीर लढाई लढू.

– प्रताप सरनाईक शिवसेना आमदार