दोन मांजरांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई : अंधेरी पूर्व येथील उच्चभ्रू संकुलातील तीन मांजरांवर विषप्रयोग करण्यात आला असून त्यापैकी दोन मांजरांचा मृत्यू झाला असून एक मांजर मृत्यूशी झुंज देत आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरीमधील ‘मानवस्थल हाइट्स’मध्ये ही घटना घडली. या इमारतीत राहणाऱ्या जॉएल सिक्वेरा आणि अन्य रहिवाशांनी पोलिसांत तक्रार केली आहे. संकुलात पाच निवासी इमारती आहेत. तिथे आठ ते दहा भटकी मांजरे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संकुलातील काही रहिवासी त्यांची देखभाल करतात. संकुलाच्या आवारात खेळणाऱ्या लहान मुलांना एक मांजर २४ मार्चला मृतावस्थेत आढळले. दुसऱ्याच दिवशी सात महिन्यांचे मांजर बेशुद्ध पडले. त्याला तात्काळ प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र त्याचाही मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसांत आणखी एक छोटे मांजर आजारी पडले. त्यालाही तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले, अशी माहिती सिक्वेरा यांनी दिली.

डॉक्टरांनी तिन्ही मांजरांवर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट केले. मांजरांच्या चाचण्यांचा अहवाल, सिक्वेरा आणि अन्य रहिवाशांनी दिलेली तक्रार, घटनास्थळ आणि तिसऱ्या मांजराची प्रत्यक्ष पाहणी करून साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या वसाहतीतील बहुतेक रहिवासी उच्चशिक्षित आहेत. मांजरांचा त्रास होत असल्याची तक्रार केली असती तर त्यांना प्राणिमित्रांकडे किंवा भटक्या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या संस्थांकडे सोपवता आले असते. मुक्या जिवांचा बळी घेणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया ‘मानवस्थल’मधील रहिवाशांनी दिली.

नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर गुमास्ता परवाना नि:शुल्क करण्यात आला आहे. त्यामुळे कामगार शुल्क व कचरा निर्मूलन शुल्क बंद झाले आहे.

– सुनीता जोशी, प्रमुख सुविधाकार, दुकाने व आस्थापना विभाग