उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेले वाहन सापडले. या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेने वाहनचोर टोळ्या आणि वाहनांची दुरुस्ती करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या सुटय़ा कांडय़ा आढळल्या. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

स्कॉर्पियो कार ही ठाण्यात राहणारे ऑटोमोबाइल व्यावसायिक हिरेन मनसुख यांची आहे. टाळेबंदीत ही कार वर्षभर एका जागी उभी होती. ती दुरुस्त करून विकण्याचा मनसुख यांचा विचार होता. ही कार घेऊन ते १७ फेब्रुवारीला ऑपेरा हाऊस येथे निघाले होते. मात्र स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी ही कार उड्डाणपुलाजवळ सोडली. रात्री परत आले तेव्हा ही कार तेथे नव्हती. याप्रकरणी त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कारचोरीची तक्रार नोंदवली. स्टिअरिंग फिरत नव्हते मग चोरणाऱ्यांनी कार कशी पुढे नेली, हा प्रश्न निर्माण झाल्याने मनसुख यांच्याकडेही चौकशी सुरू आहे.

ही कार कोणी चोरली, चोरून कोठे नेली याबाबत विक्रोळी पोलिसांसह अंबानी प्रकरण तपासणाऱ्या गुन्हे शाखेला नेमकी माहिती मिळालेली नाही. सहआयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निरीक्षणानुसार चोरी झाल्यापासून अंबानी यांच्या घराजवळ येईपर्यंत ही कार अज्ञात स्थळी, सीसीटीव्हीच्या परिघाबाहेर ठेवण्यात आली असावी.

या कारमध्ये आणखी चार बनावट वाहन क्रमांक पाटय़ा आढळल्या. त्याही अंबानी यांच्या ताफ्यातील वाहनांच्या क्रमांकाशी मिळत्याजुळत्या आहेत. त्यावरून आरोपींनी कारमायकल मार्ग, अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर काही दिवसांपासून पाळत ठेवली असावी, असाही अंदाज गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

गुन्हा नोंद

या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलम २८६ (जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने किंवा निष्काळजीपणे स्फोटकांची हाताळणी), ४६५, ४७३ (बनावट वाहन क्रमांकाचा वापर), ५०६(२)(जीवे ठार मारण्याची धमकी), १२०(ब)(कट) आणि स्फोटके अधिनियमातील कलम ४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी या प्रकरणाच्या समांतर तपासाला सुरुवात केली. या पथकाने घटनेबाबत गुन्हे शाखेकडून माहिती घेतली.

स्फोटके नागपुरातील..

* मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमधील जिलेटीनच्या कांडय़ा नागपूर येथील इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्या आहेत. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटके तयार करणारी कंपनी नागपुरात आहे. विहीर खोदणे आणि खाणकामासाठी ही स्फोटके प्रामुख्याने पुरवली जातात.

* या संदर्भात कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, स्फोटक अधिनियम २००८ आणि केंद्र सरकारच्या स्फोटके मुख्य नियंत्रकांच्या (पेसो) दिशानिर्देशानुसार कंपनीत स्फोटके तयार करण्यात येतात. प्रत्येक स्फोटकांची माहिती पेसो आणि पोलीस प्रशासनाला दिली जाते.

* एखाद्या ग्राहकाने ऑनलाइन स्फोटके खरेदीची इच्छा दर्शवल्यास त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेतला जातो व ती स्फोटके नियंत्रक कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना विकण्यात येतात. विकण्यात आलेल्या मालाची यादी दुसऱ्या अर्जाद्वारा स्फोटके नियंत्रक व पोलीस विभागाला पुरवण्यात येते.