शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा’ परीक्षेत अधिकाधिक पादर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीपासून परीक्षेची उत्तरे पेन्सिलऐवजी काळ्या शाईच्या पेनाने लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेण्यात येते. लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत अशा चार टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात येते. २०१४-१५ची लेखी परीक्षा शनिवार २० सप्टेंबर रोजी होणार आहे. राज्यभरातून तब्बल ४५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठीची ओळखपत्रे मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहेत. ती विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याचे प्रिंटआऊट काढायचे आहे. दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत ही परीक्षा होईल. एकूण १०० गुणांकरिता ही परीक्षा होणार आहे. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी स्वरूपाचे असेल.
‘परीक्षेत पारदर्शकता आणण्याकरिता पेन्सिलीऐवजी काळ्या शाईच्या पेनाने उत्तरे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेनामुळे, विद्यार्थाना एकदा उत्तर लिहिल्यानंतर खोडण्याची मुभा नसेल. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक उत्तरे लिहावी,’ असे मंडळाचे प्रताप थोरात यांनी सांगितले.
शनिवारी होणाऱ्या लेखी परीक्षेकरिता गोरेगावमध्ये ‘आम्ही गोरेगावकर’ येथे असलेले परीक्षेचे केंद्र रद्द करण्यात आले आहे. या केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा गोरेगावमधील प्रबोधन क्रीडा संकुलाजवळील ‘आदर्श विद्यालय’ या शाळेवरील केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या बदलाची दखल घ्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष थोरात यांनी केले आहे.