17 November 2019

News Flash

नवउद्य‘मी’ : वाहन खरेदीचा विश्वासार्ह पर्याय

आपल्याला एखादी समस्या दिसली की आपण त्या समस्येवर कोण तोडगा काढतोय का याची वाट पाहात बसतो.

एखादे वापरलेले वाहन खरेदी करून चांगला सराव झाला की नवी गाडी घ्यायची. अशी मानसिकता अनेकांची असते. यामुळे आजही वापरलेल्या गाडय़ांना चांगली मागणी आहे. पण या व्यवहारांमध्ये अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अपघात झालेली किंवा चोरी केलेली गाडीही आपल्याला विकली जाऊ शकते. पण आता अशा गाडय़ा खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन तसेच आवश्यक सेवा पुरविणारे ऑनलाइन माध्यम सुरू झाले आहे. या माध्यमातून तुम्हाला वापरलेल्या जुन्या गाडय़ांची खरेदी योग्य दरात व योग्य कागदपत्रांनुसार करता येणे शक्य होणार आहे.

आपल्याला एखादी समस्या दिसली की आपण त्या समस्येवर कोण तोडगा काढतोय का याची वाट पाहात बसतो. पण आयआयटीयन्स असे करत नाही. ते स्वत:हून त्या समस्येवर तोडगा काढतात आणि त्यातून व्यवसाय उभा करून नफाही कमावितात. अशीच एक समस्या आयआयटीयन शुभ बन्सला जाणवली. शुभ आपल्या मित्रासोबत वापरलेली गाडी खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्या गाडी मालकाने त्याची किंमत चार लाख रुपये इतकी सांगितली. पण त्या गाडीची अवस्था फारशी चांगली नसल्याचे दोघांनाही जाणवले. यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीच्या गाडी दुरुस्ती करणाऱ्या तज्ज्ञाला बोलविले. त्याने ती गाडी पाहिल्यानंतर या गाडीचा अपघात झाल्याची माहिती दिली. प्रत्यक्षात ही माहिती मालकाने लपविली होती. अशाचप्रकारची फसवणूक अनेकांच्या बाबतीत होत असेल. हा विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा अशा व्यवहारांसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे यावर त्यांनी विचार केला. हाऊसिंग डॉट कॉम या नवउद्योगात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांना नवउद्योग नेमका कसा चालतो याची माहिती होतीच. यामुळे शुभ याने आयआयटी मुंबई, खरगपूर आणि जबलपूर येथील आपल्या अन्य सहा मित्रांची मदत घेतली आणि सात जणांनी मिळून एक संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला व यातूनच http://www.truebil.com/ / चा जन्म झाला.

हे संकेतस्थळ सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांच्या तुलनेत वेगळे असावे यासाठी केवळ ऑनलाइन न राहता ऑफलाइन सेवाही पुरविण्याचे विचार केल्याचे शुभने सांगितले. या संकेतस्थळावर गाडी विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायची आहे याचा तपशील विक्रेत्याने नोंदविला की ट्रूबिलचा चमू विक्रेत्याच्या गाडीची सुमारे ३० ते ३५ छायाचित्रे काढतो. ही छायाचित्रे गाडीच्या विविधांगांनी काढलेली असतात. जेणे करून खरेदी करणाऱ्याला ती गाडी नेमकी कशी आहे याचा अंदाज बांधणे शक्य होते. या आधी गाडीची जास्तीत जास्त तीन ते चार छायाचित्रे उपलब्ध व्हायची. पण या संकेतस्थळामुळे गाडीची अवस्था छायाचित्रातून समजणे शक्य झाले आहे. याचबरोबर कंपनीने नेमलेले वाहनतज्ज्ञ या वाहनाची पूर्णपणे पाहणी करतात. तसेच वाहनाच्या तांत्रिक दर्जाचे एक प्रमाणपत्रही देतात. जेणेकरून वाहन विकत घेणाऱ्याची कोणतीही फसवणूक होऊ नये हा या मागचा उद्देश असल्याचे शुभने नमूद केले. या संकेतस्थळावर विक्रेता त्याला पाहिजे त्या किमतीची नोंद करू शकतो. मग जेव्हा खरेदीदार या संकेतस्थळाला भेट देतो तेव्हा त्याला त्या गाडीचा तपशील तसेच त्याचे तांत्रिक प्रमाणपत्रही पाहावयास मिळते. यानंतर गाडी पसंत केल्यावर कंपनी विक्रेता व खरेदीदार यांना योग्य किंमत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. यातून दोघांचेही नुकसान होणार नाही अशी किंमत ठरविली जात असल्याचेही शुभने नमूद केले.

गाडी खरेदी झाल्यावर वाहतूक विभागाकडून कागदपत्रांचे हस्तांतरण करण्याची जबाबदारीही कंपनी पार पाडते. यामुळे ग्राहकांना या कामाचीही काळजी उरत नाही. तसेच ग्राहकांची विश्वासार्हता टिकावी या उद्देशाने सध्या आम्ही संकेतस्थळावर २०१०नंतर खरेदी केलेली व एक लाख किमीपर्यंतचे अंतर कापलेल्या गाडीचीच नोंदणी करून घेत असल्याचेही शुभने सांगितले. हे केवळ ऑनलाइन शो-रूम नसून ऑफलाइन शो-रूमही सुरू केले आहे.

गुंतवणूक व उत्पन्नस्रोत

ही कंपनी स्थापन करण्यासाठी एप्रिल महिन्यात तीन कोटींचा तर त्यानंतर ३० कोटींचा निधी उभा राहिला आहे. या निधीतून कंपनीचे सध्याचे कामकाज सुरू आहे. याचबरोबर खरेदीदाराला सुविधांचा फायदा घेण्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून ८०० रुपये भरावे लागतात. तसेच वाहतूक विभागातील कागदपत्र हस्तांतरणासाठीही काही दर आकारले जातात असेही शुभने नमूद केले. कंपनीच्या शो-रूममध्ये गाडी ठेवण्यासाठी खरेदी किमतीवर सात टक्के आकारले जातात. तर जे वापरलेल्या वाहनांचे विक्रेते आहेत त्यांच्याकडून नोंदणी झाल्यास त्यालाही दर आकारले जात असल्याचेही शुभने नमूद केले.

भविष्याची वाटचाल

सध्या ही सेवा मुंबई व बेंगळुरू या दोन शहरांमध्ये उपलब्ध आहे. मात्र ही सेवा लवकरच दिल्ली एनसीआर व पुणे या शहरांमध्ये सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी सेवा उपलब्ध करून फसगत करून घेण्यापेक्षा एक-एक शहरात सेवा पुरविण्यावर आमचा भर असल्याचेही शुभने नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योगाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक जण तयार आहेत असे चित्र २०१५पर्यंत विद्यार्थ्यांसमोर होते. पण प्रत्यक्षात ते खरे नाही. त्यासाठी तुमच्या संकल्पनेत दम असायला हवा. तसेच तुमचे व्यवसाय नियोजन व अर्थशास्त्रीय गणिते अचूक असायला हवी. ही गणिते व्यवसाय नफा मिळवून देणारा आहे असा विश्वास देणारी असतील तरच गुंतवणूक उपलब्ध होते. यामुळे संकल्पनेबरोबरच व्यवसाय नियोजनावरही विशेष भर द्या असा सल्ला शुभने दिला.

नीरज पंडित

@nirajcpandit

First Published on December 28, 2016 2:36 am

Web Title: used car sales startup