‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाऊंज’मध्ये या वेळी एका अनोख्या संघर्षांची कहाणी ऐकायला व पाहायला मिळणार आहे. मुंबईपासून खूप लांब असलेल्या कोल्हापूरमधून आलेली, वेगवेगळ्या जाहिरातींमधून दिसलेली आणि थेट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार पटकावणारी उषा जाधव पहिल्यांदाच वेगळ्या प्रकारच्या व्यासपीठावर येणार आहे. व्हिवा लाऊंजच्या अतिथी संपादिका सोनाली कुलकर्णी तिच्याशी गप्पा मारतील. हा कार्यक्रम १२ जून रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे दुपारी ३.३० वाजता होणार आहे.
उषा जाधव हा चेहरा सर्वाच्या घराघरांत पोहोचला, तो ‘कौन बनेंगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या जाहिरातींमधून! अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या हॉट सीटवर बसून ‘बधाई हो, लडकी हुई है’ असे म्हणणारी ती मुलगी खूप सच्ची वाटली होती. मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘ट्रॅफिक सिग्नल’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटांतही श्रीगणेशा केला. ‘धग’ या तिच्या मराठी चित्रपटाने तर तिच्या अभिनयाची दखल देशपातळीवर घ्यायला लावली. उषाच्या या पूर्ण प्रवासाची कहाणी तिच्याच तोंडून ऐकण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे. या वेळी उषाला वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारून सोनाली कुलकर्णी तिला बोलते करणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित प्रेक्षकांनाही त्यांच्या मनातले प्रश्न उषाला थेट विचारता येतील.
कधी, कुठे?
आज दुपारी ३.३० वाजता
पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी
कार्यक्रम सर्वासाठी खुला.