‘लोकसत्ता गप्पा’च्या व्यासपीठावर उस्ताद राशिद खान यांची भावना

मुंबई : ‘गायकाचे घराणे’ ही महत्त्वाची गोष्ट नाही. संगीत त्याहून श्रेष्ठ आहे आणि संगीताची परंपरा पुढे नेणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. गाणे हे शरीराचे एक उपजत अंग आहे. ते मनात, हृदयात असले पाहिजे. ते तेथूनच उपजले पाहिजे, त्यासाठी संगीताशी समरस झाले पाहिजे. केवळ तासन्तास रियाज करून ती समरसता साधणार नाही; पण आज संगीत क्षेत्रात असलेल्या पिढीमध्ये ती समरसता, ते झोकून देणे आढळत नाही, अशी खंत उस्ताद राशिद खान यांनी आज ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात व्यक्त केली.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

‘लोकसत्ता गप्पा’च्या कार्यक्रमात संगीतकार राहुल रानडे यांनी उस्ताद राशिद खान यांना बोलते केले आणि गप्पांच्या ओघात राशिद खान अलगद आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागले. पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्याला ‘घडविले’ असे कृतज्ञतापूर्वक नमूद करत, आपल्याला संधी देताना पंडितजींनी त्यांच्या आणि आपल्या वयातील अंतर पुसूनच टाकले, असे राशिद खान म्हणाले. आज संगीत क्षेत्रात त्यांच्यासारखी श्रेष्ठ नावेही दिसत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या बुजुर्गानी एवढे काही करून ठेवले आहे, की ते आत्मसात केले तरी संगीत क्षेत्र बहरलेले राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र ही संगीताच्या रसिकांची श्रेष्ठ भूमी आहे. मर्मज्ञ आणि जाणकार श्रोता समोर असेल तेव्हा गायकाचा ‘मूड’ आपोआपच लागतो आणि रसिक श्रोत्यांबरोबरच गायकालाही धन्य वाटते, असे सांगत राशिद खान यांनी श्रोत्यांनाही मैफलीच्या वातावरणात आणून सोडले.

साधेपणा हा स्वभाव असतो. आजकाल संगीत क्षेत्रातही राजकारण शिरले आहे. त्यापासून दूर राहावे, सुरांच्या संगतीत राहावे, यातच मला आनंद आहे. राशिद खान यांनी हा साधेपणाही सहजपणे सांगितला. आपली विचारधारा अत्यंत साधी, शांत असली पाहिजे. साधुसंतांकडे पाहा. ते अत्यंत शांत असतात. संगीत क्षेत्रातील कलावंत असे शांत का असत नाहीत, हे मलाही पडलेले कोडेच आहे, असे सांगत राशिद खान यांनी सर्वच रसिकांच्या मनातील प्रश्न जणू समोर आणला. वय ही शारीरिक बाब आहे. विचार, मन तरुण असले की वयाचा अडसर येतच नाही. गाणं हा एक विचार आहे. त्याच्याशी प्रामाणिक, एकनिष्ठ राहावे, असे मी मानतो, असे उस्ताद राशिद खान म्हणाले. मग उस्तादजींच्या रियाजातील मैफलींच्या सुरांनी सजलेल्या वातावरणात गप्पांनाही ‘सूर’ सापडला आणि रसिक श्रोते व उस्ताद राशिद खान यांच्यात ‘संवाद’ सुरू झाला.. पुढे क्षणाक्षणाला ही ‘संवाद मैफल’ रंगत गेली.

मैफलीमध्ये चित्रपट संगीताची फर्माईश केली जाते तेव्हा काय वाटते, या प्रश्नावर उस्ताद राशिद खान म्हणाले की, जर त्या चित्रपटगीतात शास्त्रीय राग असेल आणि गीतामध्ये तोच व्यक्त होणार असेल तर ते का गायचे नाही, असा रोकडा सवाल त्यांनी केला. एखाद्याला इंग्रजी संगीतात रस असेल तर त्याच्यावर शास्त्रीय संगीताची जबरदस्ती करायची गरज नाही. संगीताचा आनंद घेणे महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.

एम. के. घारे ज्वेलर्सचे उदय घारे यांनी उस्ताद राशिद खान यांचे स्वागत केले. ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले, तर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी राशिद खान यांचा सन्मान केला. पं. रोणु मुजुमदार, पं. सतीश व्यास, पं. प्रभाकर कारेकर असे संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि डॉ. जब्बार पटेल, ज्योती सुभाष, चंद्रकात कुलकर्णी, सचिन खेडेकर, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, वैभव मांगले, प्रेमानंद गज्वी, राजीव नाईक, अजित भुरे, प्रसाद कांबळी आदी नाटय़ व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

सुरांची मोडतोड करण्यापेक्षा संगीत सुंदर कसे होईल याचा विचार अधिक व्हायला हवा. कायम संगीत शिकत राहावे. इतकेच नाही तर शिकवतानाही खूप शिकायला मिळते; किंबहुना प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतेच आणि आजही मी ते शिकत असतो. – उस्ताद राशिद खान

प्रायोजक : ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक एम. के. घारे ज्वेलर्स असून पॉवर्ड बाय महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी), तन्वी हर्बल्स आणि इंडियन ऑइल आहे.