News Flash

सहज सफर : निसर्गसौंदर्याची उधळण!

दूरवर पसरलेला अथांग समुद्रकिनारा.. बाजूला हिरवाईने नटलेला डोंगर.. नारळाची गर्द वनराई.. क्षितिजावर मावळतीला लागलेला सूर्यनारायण.. खारे वारे.. मच्छीमारांची लगबग.. हे वर्णन तळकोकणातील समुद्रकिनारी वसलेल्या एखाद्या

दूरवर पसरलेला अथांग समुद्रकिनारा.. बाजूला हिरवाईने नटलेला डोंगर.. नारळाची गर्द वनराई.. क्षितिजावर मावळतीला लागलेला सूर्यनारायण.. खारे वारे.. मच्छीमारांची लगबग.. हे वर्णन तळकोकणातील समुद्रकिनारी वसलेल्या एखाद्या गावाचे नसून, ठाणे जिल्’ााच्या पश्चिमेकडील भाईंदरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तन गावाचे आहे. अतिशय देखणे आणि मन हुरळून टाकणारे हे पर्यटनस्थळ म्हणजे ठाणे जिल्’ााच्या मुकुटावरील सुवर्णपीसच! भाईंदरमधील बकाल शहरी वातावरणापासून दूर असलेले हे किनारपट्टीवरील गाव म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिनाच. या किनारपट्टीवर जरासा विसावा घेतला तरी मन प्रफुल्लित होते.

पालघर जिल्हा वेगळा झाल्यापासून ठाणे जिल्ह्याला तसा समुद्रकिनारा कमीच लाभला. पण ठाणे जिल्ह्याचाच भाग असलेल्या मीरा-भाईंदर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेली उत्तन किनारपट्टी म्हणजे सागरी सौंदर्याची मुक्त उधळण. भाईंदरची नागरी वस्ती सोडून जसे जसे आपण उत्तन परिसराच्या दिशेने जाऊ  लागतो, तसे तसे कोकणातील खेडय़ाची आठवण होते. डौलाने उभी असलेली मच्छीमारांची घरे आणि स्वच्छ व वळणदार रस्ता मन प्रफुल्लित करतो. शहरापासून जवळ असले तरी या परिसराला नागरीकरणाची ‘हवा’ लागली नसल्याने तेथील सौंदर्य अजूनही टिकून आहे. गाव जवळ आल्यावर माशांचा भपकेदार वास नाकात जातो, पण या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेताना हा वासही हवाहवासा वाटतो.

उत्तन गावात पोहोचल्यानंतर मच्छीमारांच्या वस्तीतून पुढे गेल्यानंतर विशाल समुद्रकिनारा लागतो. या किनारपट्टीवर मच्छीमार जहाजांची लगबग सुरू असते. तेथील एक रस्ता जवळील डोंगरावर जातो. या डोंगरावरून समुद्रकिनाऱ्याचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते. डोंगराच्या एका बाजूने खाली उतरल्यास अथांग पसरलेली चौपाटी लागते. या चौपाटीवरील वाळूवर दोन क्षण बसल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्न वाटते. झोंबणारा खारा वारा आणि रोमँटिक वातावरण यामुळे या किनारपट्टीवर प्रेमीयुगुलांची गर्दी असते. मात्र कुटुंबासोबतही फिरण्यासाठी हा परिसर अतिशय उत्तम आहे.

किनाऱ्यावर समुद्राजवळ काळे कातळ आहेत. या कातळावर बसून समुद्रात गुडुप होणाऱ्या तांबूस रंगाचे सूर्यसौंदर्य पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. या दगडांमध्ये मोठमोठे शंख-शिंपले सापडतात, त्यामुळे लहान मुलांनाही त्याचा शोध घेण्यात आनंद वाटेल. पण दगडांच्या कपारीत खेकडे असल्याने जरा जपून.

किनारपट्टीच्या एका बाजूला नारळाची घनदाट, गर्द वनराई आहे. या वनराईत वाळूवर घटकाभर विसावा घेतला तरी बरे वाटते. या चौपाटीवर मच्छीमारांची लगबग पाहण्यासारखी आहे. किनारपट्टीवर पकडलेले मासे वेगळे करणे, ते स्वच्छ करणे, किनारपट्टीची साफसफाई करणे आदी कामे हे मच्छीमार बांधव करत असतात. किनारपट्टीची नेहमीच साफसफाई करणाऱ्या या मच्छीमारांमुळे येथील समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ दिसतो.

या किनारपट्टीवर एक देखणे चर्च आहे. ‘भाटेबंदर माता वेलंकनी तीर्थमंदिर’ नावाचे हे चर्च आणि त्याभोवतीचा बगिचा अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे. जवळच दर्यामाता चर्च आणि ख्रिस्ती धर्मीयांची श्रद्धास्थाने आहेत. या किनारपट्टीचे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारा मत्स्यआहार. अतिशय ताजी व रुचकर मासळी येथे मिळत असल्याने माशांचे कालवण, फ्राय मासे खाण्यास एक वेगळीच मजा आहे, त्याशिवाय स्वस्त दरात ताजी मासळी येथून आपण घेऊनही जाऊ  शकतो. जुहू, गिरगाव, अक्सा, गोराई येथील चौपाटय़ांवरील गर्दीला कंटाळला असाल तर उत्तन चौपाटी हा त्याला पर्याय आहे. गजबजलेल्या शहरी वातावरणातून बाहेर पडून एक दिवस किंवा एखादी संध्याकाळ आल्हाददायक व प्रसन्न वातावरणात घालवायची इच्छा असेल तर उत्तन चौपाटीला नक्की भेट द्या.

उत्तन चौपाटी  

कसे जाल?

भाईंदरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी भाईंदर व मीरा रोड स्थानकापासून बसची सोय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:33 am

Web Title: uttan chowpatty beach
Next Stories
1 कर्जहप्ता भरण्यास आणखी मुदतवाढ
2 सरकारी कर्मचाऱ्याचा गोपनीय अहवाल आता सामान्यांच्या ‘हातात’!
3 अक्षय जोशी आणि वैभव मुंढे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
Just Now!
X