बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा छडा लावून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना तुरुंगाची हवा खायला पाठवणारे तसेच अनैतिक धंद्यांना लगाम घालणारे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची सरकारने मंगळवारी रात्री बदली केली असून त्यांच्या जागी पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय वरिष्ठ पोलीस निरिक्षक ते उपायुक्त या दरम्यानच्या विविध पदांवरील तब्बल १६० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ठाण्यात गेल्या दोन-अडीच वर्षांत लक्ष्मीनारायण हे गुन्हेगार आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरले होते.  त्यांना याच पदावर ठेवण्याबाबत नागरिक, तसेच शहरातील काही मंडळी प्रयत्नशील असतानाच सरकारने त्यांची बदली केली. आता त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) या पदी मुंबईत नियुक्त करण्यात आले आहे.

अमरावतीचे पोलीस आयुक्त राजकुमार वटकर यांची पदोन्नतीने मुंबईत नागरी हक्क संरक्षण दलाचे महानिरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली असून त्यांची अमरावतीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याबरोबरच पाच पोलीस उपायुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. तर १२३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली असून त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.