03 June 2020

News Flash

बालभारतीतील शैक्षणिक पदे रिक्त

संचालकपद हे तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या निर्मिती प्रमुखांकडे

(संग्रहित छायाचित्र)

संचालकपद हे तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या निर्मिती प्रमुखांकडे

मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हाती दरवर्षी पाठय़पुस्तके देणाऱ्या ‘बालभारती’चा कारभार सध्या अपुऱ्या मनुष्यबळावर रेटला जात आहे.

शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले बालभारतीचे संचालकपद हे तांत्रिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या निर्मिती प्रमुखांकडे आहे. त्याचबरोबर पुस्तकांतील मजकुराला अंतिम स्वरूप देणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. राज्यातील शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाच्या संस्थांमध्ये बालभारती अग्रेसर आहे. दरवर्षी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हाती बालभारती पाठय़पुस्तके देते. मात्र शैक्षणिक जबाबदारी सांभाळण्यासाठी सध्या संस्थेकडे शैक्षणिक क्षेत्रातील पुरेसे मनुष्यबळ नाही. संस्थेतील एकूण कर्मचारी संख्या मोठी दिसत असली तरी त्यातील बहुतांशी पदे ही तांत्रिकी आहेत. शैक्षणिक पदे म्हणजेच विषयानुसार पुस्तकांतील मजकुराची जबाबदारी असणारी पदे रिक्त आहेत.

बालभारतीचे संचालकपद हे गेले अनेक महिने रिक्त आहे. सध्या बालभारतीच्या निर्मिती प्रमुखांकडे संचालकपदाचीही जबाबदारी आहे. संचालक हे शैक्षणिक पद आहे तर निर्मिती प्रमुख हे तांत्रिक पद आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयानुसार बालभारतीत विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अभ्यास मंडळांनी तयार केलेल्या पाठय़पुस्तकांतील मजकुराला अंतिम स्वरूप विशेष अधिकारी देतात. ज्या विषयांचा आवाका मोठा आहे त्या विषयांना साहाय्यकांचीही पदे आहेत. मात्र, विशेष अधिकाऱ्यांची अनेक पदे सध्या रिक्त आहेत.

भाषा विषयांमध्ये आठ विशेष अधिकारी आहेत, त्यातील दोन पदे रिक्त आहेत. पाच साहाय्यकांपैकी दोन पदे रिक्त आहेत. इतिहास, गणित, कार्यानुभव या विषयांच्या विशेष अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. भूगोल, विज्ञान या विषयांना साहाय्यक नाहीत. नकाशाकाराचे पदही रिक्त आहे.

अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली

बालभारतीप्रमाणेच शिक्षण विभागाच्या इतरही संचालनालयांची अशीच स्थिती आहे. सध्या सातपैकी चारच संचालक कार्यरत आहेत. सहसंचालक आणि खालील अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. पदोन्नती रखडल्यामुळे अधिकाऱ्यांमध्येही नाराजी आहे.

जबाबदारी वाढली, मात्र अधिकारी नाहीत

सुरुवातीला बालभारती आठवीपर्यंतची पुस्तके तयार करत असे, तर नववी ते बारावीच्या पुस्तकांची फक्त छापाई बालभारती करत होती. आता नववी ते बारावीच्या पुस्तकांचे कामही बालभारतीकडे देण्यात आले आहे. नववी आणि दहावीचे बहुतेक विषय हे आठवीप्रमाणेच आहेत. मात्र अकरावी बारावीला शाखेनुसार विषयसंख्या वाढते. आहे त्या विशेष अधिकाऱ्यांना या सर्व विषयांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. शैक्षणिक पदे रिक्त असल्याचा फटका बालभारतीच्या दैनंदिन कामकाजाला बसतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 1:01 am

Web Title: vacancies in balbharati maharashtra school book publishers zws 70
Next Stories
1 विद्यापीठे, महाविद्यालयांमध्येही ‘मराठी भाषा गौरव’ दिन
2 ‘मुंबई श्री’च्या मंचावर अवतरणार पीळदार सौंदर्य; ‘मिस मुंबई’साठी चुरशीची लढत
3 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला
Just Now!
X