News Flash

अग्निशमन दलात पहिल्यांदाच ७३६ जागांवर भरती

तीन महिन्यांत जादा कामाच्या तासांची मर्यादा ५० वरून १०० तास करण्याचा प्रस्तावही आहे.

येत्या तीन महिन्यांत जादा कामाच्या तासांची मर्यादा ५०वरून १०० तासांवर नेणार

अग्निशमन दलाकडील कर्मचाऱ्यांचा तुटवडा भरून काढण्याकरिता पुढील वर्षभरात टप्प्या टप्प्यात ७३६ नवीन जागांवर भरती केली जाणार आहे. याशिवाय तीन महिन्यांत जादा कामाच्या तासांची मर्यादा ५० वरून १०० तास करण्याचा प्रस्तावही आहे.

गेल्या काही वर्षांत अग्निशमन दल आधुनिक वाहने, यंत्रांनी सुसज्ज झाले असून येत्या वर्षांअखेर आणखी १७ लघु अग्निशमन केंद्र अस्तित्वात येतील. ही सर्व यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी अग्निशमन दलाला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अग्निशमन दलात तब्बल तीस वर्षांपूर्वी संमत केलेल्या पदांवरच भरती सुरू होती. मात्र गेल्या काही वर्षांत आधुनिक वाहने, यंत्रणा यांची भर पडली आहे. त्यातच या वर्षांअखेरीस १९ लघु अग्निशमन केंद्रही सुरू होणार आहेत. पुढील दोन वर्षांतही अनेक वाहने, यंत्रे यांची भर पडणार आहे. म्हणून दलातील पदे वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली.

यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला असून पुढील महिन्याभरात भरतीप्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे. ही भरती टप्प्याटप्प्यात होणार असून निवडप्रक्रिया तसेच त्यानंतरचा सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी लक्षात घेता सर्व भरती पूर्ण होण्यासाठी किमान वर्ष ते दीड वर्षांचा कालावधी लागेल.

कर्मचारी भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन कामाच्या जादा तासांची मर्यादा दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तीन महिन्यांत पन्नास तास जादा काम करण्याची मर्यादा होती. मात्र कर्मचाऱ्यांना पन्नास तासांपेक्षा जास्त तास काम करावे लागत आहे. आगीच्या घटनांमध्ये तातडीने मदत पुरवणे आवश्यक असते. एखाद्या कर्मचाऱ्याने जादा तासांची मर्यादा संपल्याने हे काम नाकारले तर बिकट स्थिती येऊ शकते. त्यामुळे तासांची मर्यादा वाढवण्याची सूचना केली होती, असे मनसेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य चेतन कदम यांनी सांगितले. अग्निशमन दलाने तीन महिन्यात शंभर तासांपर्यंत मर्यादा वाढवण्याचे पालिका प्रशासनाला सुचवले आहे.

कबूतर, झाडांच्या कामांतून सुटका नाही

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना झाडाच्या फांद्या हटवणे, कबुतराची सुटका करणे यासारखी कामे या दलाला करावी लागतात. काळबादेवी येथील गोकुळ हाऊस इमारतीच्या आगीनंतर सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालात या कामाचा भार हलका करण्याची सूचना केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:23 am

Web Title: vacancy in fire brigade
Next Stories
1 बेदरकार वाहनांचा ‘वेग’ वाढला!
2 लवकरच माथेरानचे सौंदर्यीकरण
3 मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांसाठी विमानतळासारखे प्रतीक्षालय       
Just Now!
X