News Flash

मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि बीएमसीनं एकत्र यायला हवं; काँग्रेस नेत्याचा सल्ला

मिलिंद देवरांनी ट्विट करत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र/पीटीआय)

राज्यात करोना विषाणू पुन्हा एकदा सोकावताना दिसत आहे. मुंबईतही करोनाचा उद्रेक झाला असून, दररोज तीन ते चार हजारांच्या सरासरीने लोक संक्रमित होत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाउनचं संकट घोंगावू लागलं असून, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

राज्यात रविवारी ४० हजार ४१४ नवीन रुग्ण आढळले. यापैकी ६ हजार ९२३ म्हणजेच जवळपास सात हजार रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध वाढताना दिसत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत निर्बंध वाढल्यास त्याचा अर्थचक्रावर होणाऱ्या परिणामांकडे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी लक्ष वेधलं आहे.

मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात आणून दिले आहेत. “देशातील करोना रुग्णसंख्येपैकी १० टक्के नवीन रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत. तर त्याचबरोबर देशाच्या एकूण जीडीपीपैकी ६ टक्के वाटा मुंबईचा आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेनं एकत्र यायला हवं आणि प्रत्येक प्रौढ (१८ वर्षांवरील) मुंबईकरांचं होईल तितक्या लवकर लसीकरण करायला हवं,” अशी सूचना मिलिंद देवरा यांनी केली आहे.

पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमधील सकारात्मक अहवालाचे प्रमाण (पॉझिटिव्हीटी रेट) अधिक असल्याचं आढळलं आहे. देशभरात २४ कोटींहून अधिक संशयित रुग्णांची करोना चाचणी केली गेली. त्यात ५ टक्के अहवाल सकारात्मक आले. परंतु महाराष्ट्रात हेच प्रमाण २२.७८ टक्के आढळून आलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं रविवारी जाहीर केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 8:24 am

Web Title: vaccinate every adult mumbaikar as quickly as possible says milind deora bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्य टाळेबंदीच्या उंबरठ्यावर!
2 पवार-शहा भेटीच्या वृताने तर्कवितर्कांना उधाण
3 बॉम्बे बार असोसिएशनने केली आभासी पध्दतीने न्यायालयीन सुनावणीची मागणी
Just Now!
X