News Flash

लसीकरण तीन दिवस बंद

शुक्रवार, ३० एप्रिल ते रविवार, २ मे २०२१ असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद

(संग्रहित छायाचित्र)

करोनावरील लशींचा साठा संपल्याने मुंबईतील लसीकरण तीन दिवस बंद राहणार आहे. लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दैनंदिन लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करूनही पालिकेला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे शुक्रवार, ३० एप्रिल ते रविवार, २ मे २०२१ असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच १ मेपासून नियोजित १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्याअभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यताही पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून ६३ लसीकरण केंद्रांवर तर खासगी रुग्णालयांत ७३ लसीकरण केंद्रांवर करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन दैनंदिन लसीकरण मोहिमेचे नियोजन प्रशासन करीत आहे. त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमांतून सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते आहे.

वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण सुरू झाल्याने आपल्याला लस मिळणार नाही, असा गैरसमज ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी बाळगू नये. लसीकरणाची व्याप्ती वाढली तरी ४५ वर्षे व त्यावरील वयाच्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येईल, असेही पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

खात्रीपूर्वक लस मिळणार!

४५ वर्षे व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. नागरिकांनी मनात संभ्रम ठेवू नये. लससाठा उपलब्ध होताच प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. या दरम्यानच्या कालावधीत, महानगरपालिकेला लससाठा प्राप्त झाला व लसीकरण सुरू होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल. नोंदणीकृत पात्र व्यक्तींनाच आता लस दिली जाणार आहे.

पालिकेचे आवाहन 

*  लस देताना दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य असेल.

*  लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली असेल तरच लस देण्यात येईल.

*  ज्येष्ठ नागरिकांना व गरजूंना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी साहाय्य करावे, म्हणून वेगवेगळ्या अशासकीय संस्था, व्यक्ती यांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यापूर्वीही आवाहन करण्यात आले आहे.

*  लशीची पहिली मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांनीदेखील चिंताग्रस्त होऊ नये. प्रथम मात्रा घेतल्यानंतर शरीरात पुरेशी प्रतिपिंडे (अ‍ॅण्टिबॉडीज) निर्माण होतात. त्यामुळे काही कारणाने दुसरी मात्रा घेण्यास थोडासा विलंब झाला तरी काळजी करू नये.

‘दोन मुखपट्ट्या लावून या!’

लससाठा उपलब्ध झाल्यानंतर, लसीकरणासाठी ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांनी केंद्रांवर रांगेत उभे राहून गर्दी करू नये. गर्दी केल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका वाढतो, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर येताना आणि वावरताना एकावर एक अशा दोन मुखपट्ट्या लावून यावे, असेही आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:00 am

Web Title: vaccination closed for three days abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबईच्या आर्द्रतेत वाढ
2 ४१९२ नवे रुग्ण, ८२ मृत्यू
3 कर्जरोख्यांतून चार हजार कोटींचा निधी
Just Now!
X