मुंबई : शहरातील २४९ केंद्रांवर आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांबरोबरच ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही मोफत लसीकरण के ले जाणार आहे. पहिल्या व दुसऱ्या मात्रेसाठी हे लसीकरण होणार असून त्यात ५० टक्के  मात्रा थेट येणाऱ्यांसाठी आणि ५० टक्के  मात्रा नोंदणी करून येणाऱ्यांसाठी दिल्या जाणार आहेत. मात्र १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण पुढील टप्प्यात केले जाणार आहे.

मुंबईत सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस थेट लसीकरण के ले जाते.  मात्र आजपासून  ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण के ले जाणार आहे.

केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून हे लसीकरण दोन टप्प्यांमध्ये के ले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.  तर सध्या प्रत्येक नगरसेवक प्रभागानुसार लसीकरण केंद्र सुरू असून त्यांची संख्याही वाढविण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

ठाणे पालिकाही सज्ज

ठाणे : शहरात  ४५ वर्षांवरील नागरिकांना मंगळवार आणि शनिवार तर, इतर दिवशी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना पालिकेच्या सर्वच केंद्रावर आजपासून लस देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कोविन अ‍ॅपवरील नवीन बदलामुळे ५० टक्के ऑनलाइन नोंदणी, तर ५० टक्के थेट पद्धतीने लस देण्यात येणार  आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक कोविन अ‍ॅपवर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती  पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये आणि कोविन अ‍ॅपवर जास्तीत जास्त  ऑनलाइन नोंदणी करूनच लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.