पहिली मात्रा घेणाऱ्यांचीही उपस्थिती, अनेक जण लस न घेताच माघारी

मुंबई : लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसतानाही ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे मंगळवारी अनेक केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. दुसरी मात्रा घेणाऱ्यांसह पहिल्या मात्रेसाठीही मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने गर्दीला आवरताना यंत्रणेची तारांबळ उडाली. त्यामुळे अनेकांना लस न घेताच परतावे लागले.

पालिकेने साठय़ाअभावी चार दिवस ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवले होते. पालिकेने मंगळवारी दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्याचे जाहीर केले. त्यामुळे अनेक केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी झाली.

वरळीतील राज्य विमा कामगार रुग्णालयात ४५ वर्षांपुढील आणि लशीची पहिली मात्र घेणारेही येत होते. सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सुमारे ३५० नागरिकांना दुसरी मात्रा दिली गेली. दरम्यान नोंदणी केलेले वेळ न घेतलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचीही केंद्रावर गर्दी झाली होती. यातून काहीजण वादही घालत होते, असे केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वरळीतील पोदार रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरही हीच स्थिती होती. मात्र ६० वर्षांपुढील आणि अद्यापही लस न घेतलेले ज्येष्ठ आले तर त्यांचे लसीकरण केल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

२६,९४४ जणांचे लसीकरण

मंगळवारी मुंबईत एकूण २६ हजार ९४४ जणांचे लसीकरण केले गेले. यात १८ ते ४४ वयोगटातील २३६० जणांचा समावेश होता, तर ६० वर्षांवरील १३,०८६ आणि ४५ ते ६० वयोगटातील ८५१४ जणांनी लस घेतली.

४५ वर्षांपुढील लसीकरण आजपासून नियमित

पालिकेसाठी सुमारे १ लाख लसींचा साठा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत दाखल होईल. बुधवारी सकाळी हा साठा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील शासकीय व महानगरपालिका करोना लसीकरण केंद्रांवर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.  ४५ वर्ष व त्यावरील वयोगटामध्ये पहिली व दुसरी अशी दोन्ही मात्रा (डोस) पात्र नागरिकांना देण्यात येईल. मात्र, यामध्ये पहिली मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना कोविन अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. तर दुसरी मात्रा घेण्यासाठी थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांनाही लस देण्यात येईल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना ८० टक्के नोंदणीकृत तर २० टक्के थेट येणारे नागरिक यांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तरुण वयोगटासाठी १८ लाख मात्रांची खरेदी

राज्याला ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्राकडून नऊ लाख लशींच्या मात्रा मिळाल्या आहेत. तर १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी सुमारे १८ लाख लशींच्या मात्रा खरेदी के ल्या जाणार आहेत. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढेल. १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी कोविशिल्डच्या १३ लाख ५८ हजार तर कोव्हॅक्सिनच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक मात्रा खरेदीचे आदेश दिलेले आहेत.

      – राजेश टोपे, आरोग्यमंत्री 

अ‍ॅपमधील चुकीमुळे केंद्रावर ताण

वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील ५०० लाभार्थ्यांसह ४५ वर्षांवरील एक हजार जणांना लसीकरणासाठी येण्याचा संदेश पाठविला होता. या व्यतिरिक्त जवळपास १३०० नागरिकांना पहिली आणि दुसरी मात्रा घेण्याचा संदेश अ‍ॅपमधून पाठविला गेला. त्यामुळे हेही लोक केंद्रावर आल्याने यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. आलेल्या १३०० लोकांना परत पाठविणे शक्य नसल्याने पालिकेच्या परवानगीने राज्यातील १८ ते ४४ वर्षांच्या लसीकरणाच्या साठय़ातील साठा वापरला आणि लसीकरण केले, असे केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले. गर्दीला केंद्रावर थोपवून ठेवताना पोलीस आणि रुग्णालय यंत्रणेच्या नाकीनऊ आले.