‘भारत बायोटेक’ आणि ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ (आयसीएमआर) निर्मित ‘कोव्हॅक्सीन’ लशीचे आजपासून देशभरात लसीकरण सुरू होणार असले तरी वैद्यकीय चाचण्याअंर्तगत हे लसीकरण कसे केले जाणार आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता केंद्रीय महानियंत्रकांनी (डीसीजीआय) दिलेली नाही. त्यामुळे दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाईसह अन्य बाबींबाबत संभ्रम कायम असून याबाबत अधिक स्पष्टता देण्याची मागणी केली जात आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असताना वैद्यकीय चाचण्याअंतर्गत नियंत्रित आपत्कालीन वापरास डीसीजीआयने या लशीस मान्यता दिलेली आहे. त्यानुसार शनिवारपासून लसीकरणही सुरू केले जाणार आहे. परंतु शुक्रवारी केंद्राने जाहीर केलेल्या लशीच्या नियमावलीत वैद्यकीय चाचण्याअंतर्गत वापराबाबत उल्लेख केलेला नाही. तसेच यात लाभार्थ्यांची नोंदणी कशी केली जाईल, संमतीपत्रक घेणार का याबाबत माहिती दिलेली नाही.

वैद्यकीय चाचण्याअंतर्गत या लशीच्या वापराची नियमावली जाहीर करण्याची मागणी ऑल इंडिया ड्रग अ‍ॅक्शन नेटवर्कने डीसीजीआयकडे केली आहे. यात लाभार्थ्यांकडून संमती पत्रक घेतले जाईल का, दुष्परिणाम झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल का याबाबत स्पष्टता देण्याची मागणी केली आहे.

राज्याला कोव्हॅक्सीनच्या २० हजार कुप्या मिळाल्या आहेत. मुंबईत जे.जे. रुग्णालयासह सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे आणि अमरावती जिल्हा रुग्णालय अशा सहा केंद्रावर ही लस दिली जाणार आहे.

जे.जे. रुग्णालयाला दोन हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. शनिवारी १०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे जे.जे. रुग्णालयातील सामाजिकशास्त्र विभागाचे डॉ. ललित संखे यांनी सांगितले.

ही लस देताना संमतीपत्रक घेण्याच्या सूचना आलेल्या आहेत. परंतु दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल का याबाबतची माहिती अद्याप केंद्रीय आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेली नाही, असे राज्य लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. डी.एन.पाटील यांनी सांगितले.

एका व्यक्तीला दोन मात्रा याप्रमाणे १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन सुरू आहे. ही लस ऐच्छिक आहे. परंतु लस घेणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध लशींपैकी लस निवडीचा पर्याय दिला जाणार नाही. त्यामुळे या केंद्रावर लस देण्यासाठी निवड केलेल्या कर्मचाऱ्यांना ही लस घ्यावी लागेल, अन्यथा लस न घेण्याचा मार्गही खुला आहे, असे वैद्यकीय संशोधन आणि संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले.