मुंबई: लशीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी गुरुवारी सर्व केंद्रावर विशेष लसीकरण पालिकेने आयोजित केले आहे. त्यामुळे या दिवशी पहिली मात्रा दिली जाणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे पालिकेने जाहीर केले आहे.

कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी २ लाख ६० हजार नागरिक प्रतीक्षेत होते. दुसऱ्या मात्रेचा कालावधी सुरू झाला तरी यांना लस मिळत नसल्यामुळे पालिकेने विशेष लसीकरण गेल्या आठवडय़ात ४ सप्टेंबर रोजी आयोजित केले होते. यामध्ये १ लाख ७९ हजार ९३८ नागरिकांना दुसरी मात्रा दिली गेली. तेव्हा उर्वरित दुसऱ्या मात्राधारकांसाठी ९ सप्टेंबर रोजी पुन्हा विशेष लसीकरण आयोजित करण्यात आले आहे.

ठाण्यात गणेशोत्सवाच्या काळात लसीकरण बंद

ठाणे : महापालिका क्षेत्रात लशींचा साठा उपलब्ध होऊ लागल्याने गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेला वेग आला असतानाच गणेशोत्सवाच्या काळात लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या निर्णयानुसार गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन असे पाच दिवस शहरात लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने कळविले आहे. या निर्णयानुसार १०, ११, १४, १६ व १९ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने कळविले आहे. संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.