News Flash

१८-४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित

देशातील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे १ मेपासून लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

४५ वर्षांवरील नागरिकांची पहिली मात्राही लांबणीवर

मुंबई : लसीकरणासाठी होणारी गर्दी, लशींचा पुरेसा साठा नसल्याने आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये उडणारे खटके  हे चित्र राज्यात गेले काही दिवस नित्याचेच झाल्याने १८ ते ४४ या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम तूर्त स्थगित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. ४५ वर्षांवरील नागरिकांना लशीची दुसरी मात्रा प्राधान्याने दिली जाणार असून, पुढील काही दिवस या वयोगटातील नागरिकांना पहिली मात्राही दिली जाणार नाही. लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरणाला गती देता येत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

देशातील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे १ मेपासून लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. केंद्राकडून होणारा लशींचा अपुरा पुरवठा तसेच लशींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीने पुरेशा लशी पुरविण्याबाबत असमर्थतता व्यक्त केल्याने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण १ मेपासून केले जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. पुरेसा साठा नसल्याने १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण नंतर सुरू करावे, असा आरोग्य खात्याचाही प्रस्ताव होता. मात्र केंद्राच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मेपासून राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील ठरावीक जणांचे लसीकरण सुरू केले जाईल, असे जाहीर केले. त्यानुसार लसीकरण सुरूही झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून केंद्राकडून लशींचा पुरेसा पुरवठाच झालेला नाही.

लसटंचाईमुळे राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. राज्यभरात आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये खटके उडत आहेत. त्यातच ४५ वर्षांपुढील लाखो नागरिकांना पात्र असूनही लशीची दुसरी मात्रा मिळत नसल्याने लोकांमध्ये संताप आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही सर्वत्र लस मिळत नव्हती. लशींचा साठा उपलब्ध न होणे, तरुण वर्गात सरकारबद्दल निर्माण होणारी नाराजी यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्त स्थगित करण्याचा निर्णय झाल्याचे टोपे यांनी सांगितले.

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारकडून पुरेशी लस मिळत नसल्याने आता राज्याने खरेदी केलेली लस ४५ वर्षांपुढील नागरिकांना देण्यात येणार आहे. दुसऱ्या मात्रांसाठी राज्यात कोव्हिशिल्डच्या १६ लाख तर कोव्हॅक्सिनच्या ४ लाख मात्रांची गरज आहे. सरकारकडे कोव्हिशिल्डच्या ७ लाख आणि कोव्हॅक्सिनच्या ३ लाख अशा १० लाख मात्रा उपलब्ध असून पुढील चार दिवस केवळ दुसऱ्या मात्रांसाठीच लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ४५ वर्षांपुढील नागरिकांनाही पहिली मात्रा घेण्यासाठी आठवडाभर थांबावे लागेल, असे टोपे यांनी सांगितले.

लसटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीरमचे अदर पुनावाला यांच्यात चर्चा झाली असून २० मेनंतर प्रत्येक महिन्यात राज्याला कोव्हिशिल्डच्या दीड कोटी मात्रा देण्याची ग्वाही पुनावाला यांनी दिली आहे. त्यानंतर लसींच्या उपलब्धतेनुसार १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच लसीकरणाबाबत मुख्यमंत्री लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असून वाढीव लशींची मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:54 am

Web Title: vaccination of 18 44 year olds postponed akp 94
Next Stories
1 …तर जलसंपदा विभागच बंद करा!
2 एकरकमी दंड किंवा अधिमूल्य आकारून जमीन वापराची परवानगी
3 दया नायक यांचा बदली आदेश स्थगित
Just Now!
X