News Flash

शंभर वर्षांच्या महिलेचे लसीकरण 

सहा दिवसांत ७६ हजार ज्येष्ठांना लस

(संग्रहित छायाचित्र)

ज्येष्ठांच्या लसीकरणाला शहरात चांगला प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) करोना केंद्रामध्ये १०० वर्षांच्या महिलेला लस देण्यात आली.

अंधेरी येथील १००वर्षे वयाच्या प्रभावती खेडकर त्यांच्या नातीसह लस घेण्यासाठी बीकेसीतील करोना केंद्रात गेल्या होत्या. आधारकार्डवर त्यांची जन्मतारीख ५ मार्च १९२१ अशी होती. शुक्रवारी त्यांना १०० वर्षे पूर्ण झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.  त्यांचे लसीकरण तर केलेच, परंतु त्यांचा शंभरावा वाढदिवसही साजरा केला. खेडकर आणि त्यांच्या ७४ वर्षीय मुलाने एकत्रित लस घेतली.

खेडकर वर्षभरापासून घराबाहेर पडल्या नव्हत्या. परंतु  गेल्यावर्षांपर्यंत त्या भजनी मंडळात जात होत्या.  कार्यक्रमात सहभाग घेत होत्या. त्या स्वत: वर्तमानपत्र वाचतात, बातम्याही बघतात. त्यामुळे लस घेणे  म्हणजे काय हे त्यांना समजवावे लागले नाही.

या वयोगटातील व्यक्तींना अधिक धोका असल्याने आम्ही तिला लस दिली, असे त्यांची नात रूचिता हिने सांगितले.

मुंबईत मागील सहा दिवसांत ६० वर्षांवरील ७६ हजार ३६३ ज्येष्ठांचे लसीकरण झाले, तर ४५ वर्षांवरील ८१८३ जणांनी लस घेतली आहे. पालिकेच्या माहीम प्रसूतिगृह आणि जगजीवन राम सेंट्रल रेल्वे रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात लसीकरण सुरू झाले आहे. तसेच प्लाटिनम रुग्णालय (मुलुंड), शांतिनिकेतन (घाटकोपर), रिद्धिविनायक मालाड येथेही सोमवारपासून लसीकरण सुरू होणार आहे.

लसीकरणासाठी ९० वर्षांवरील अनेक व्यक्ती येत आहेत.  त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात येते. १०० वर्षांच्या आजी लसीकरणाला आल्या त्याच दिवशी आणखी एका ९८ वर्षीय आजीदेखील लसीकरणासाठी आल्या होत्या.

– डॉ. राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी करोना केंद्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 12:29 am

Web Title: vaccination of a hundred year old woman abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मनसुख मृत्युप्रकरणी हत्येचा गुन्हा
2 मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी
3 राज्यात आठवडय़ाभरात ५० हजार करोनाबाधित
Just Now!
X