पाच दिवसांनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू; अनेक केंद्रांवर अनियंत्रित गर्दी

मुंबई : पाच दिवसानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीचे लसीकरण सुरू झाल्यामुळे मुंबईतील अनेक केंद्रांवर बुधवारी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केल्यामुळे अनेक केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. अनेक केंद्रांवर नागरिकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. महापालिकेने सरकारच्या सूचनेनुसार खासगी केंद्रांवरील लसीकरण बंद केल्यामुळे वेळ घेऊन आलेल्यांनाही रांगेतच ताटकळत राहावे लागत असून ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्तींचे हाल होत आहेत.

लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अद्यापही मुंबईतील लसीकरण मोहीम सुरळीत सुरू झालेली नाही. ४५ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरणही पूर्ण झालेले नाही. त्यातच रोज दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. अनेक केंद्रावर सकाळपासून लागणाऱ्या रांगांनी केंद्रावरील कर्मचारी  आणि व्यवस्थापन हवालदिल झाले आहे. खासगी लसीकरण केंद्रेही बंद केल्यानेही नागरिकांना पालिकेच्या केंद्रांशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यात वेळ घेतली तरी रांगेतच ताटकळत राहावे लागत असल्याने आता लस मिळविण्यासाठी ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील सर्वानाच गर्दीमध्ये राहूनच धडपड करावी लागत आहे. वेळ घेतली असली तरी टोकन घेऊनच लसीकरण केले जाईल, असा नियम पालिकेच्या काही लसीकरण केंद्रांनी लागू केला आहे. त्यामुळे नोंदणी केलेले, वेळ घेतलेले आणि नोंदणी न के लेले अशा सर्वानाच  केंद्रावर पहाटे चार वाजल्यापासून तर काही केंद्रावर सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगा लावाव्या लागत आहेत.

पहाटेपासूनच टोकन घेण्यासाठी रांगा

कांदिवलीजवळील कामगार विमा रुग्णालयात दरदिवशी १०० टोकन दिले जातात. यासाठी सकाळी पाच वाजता रांगेत थांबावे लागेल, असे रुग्णालयाने सांगितले. त्यानंतरही जवळपास २०० नागरिकांना रांगेत थांबूनही लस न घेताच परतावे लागले. बोरिवली येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात पहिल्या मात्रेसाठी नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. दुसऱ्या मात्रेसाठी २०० टोकन देण्यात आली. ते घेण्यासाठी लोकांनी सकाळी ५ वाजल्यापासून केंद्राच्या बाहेर रांग लावली होती. अनेकजण टोकन मिळाले नसतानाही लस मिळण्याच्या आशेने रांगेत उभे होते. आदल्या दिवशी ऑनलाइन नोंदणी के लेल्यांनाही टोकन न मिळाल्याने लस न घेताच परतावे लागले. आशा शहा यांचे कुटुंबीय सकाळी ५ वाजल्यापासून रांगेत उभे होते. जवळपास चार तासांनी साधारण ९ वाजता टोकन आणि दुपारी १२ नंतर लस मिळाली. बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात सकाळी ६ वाजल्यापासून रांगेत उभ्या राहिलेल्या उल्का गावडा यांना दुपारी ३ वाजेपर्यंत टोकन मिळाले नव्हते.

राजकीय पक्षांची घुसखोरी

भगवती रुग्णालयात शेकडो सामान्य नागरिक (टोकन) मिळण्याच्या आशेवर उन्हातान्हात रांग लावून उभे असताना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या ओळखीतल्या लोकांना दुसऱ्या दाराने आत सोडत असल्याचे दिसून आले. हे सर्वजण अत्यावश्यक सेवेतील असल्याची माहिती येथील सुरक्षारक्षक देत असले तरी रांगेत उभ्या असणाऱ्यांकडे चौकशी केली असता प्रत्येकजण वेगवेगळी ओळख सांगत होते. काहीजण कर्करोग रुग्ण असल्याचे सांगत होते तर काहीजण आम्ही कोणासोबत तरी आलो आहोत, अशी वरवरची उत्तरं देत होते. या प्रकाराबाबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शांताराम कावडे यांच्याकडे चौकशी केली असता ८० टक्के सामान्य नागरिक आणि २० टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना टोकन दिले जात आहे, अशी माहिती दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये केवळ भगवती रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचाच समावेश असल्याचे डॉ. कावडे यांनी सांगितले तरी ओळखीपाळखीतून प्रवेश घेणारे  इतर रुग्णालयांची नावे सांगत होते. काहींकडे अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्रही नव्हते.

सर्वासाठी एकच रांग

* केंद्रावर गर्दी होऊ नये आणि ताटकळत राहावे लागू नये म्हणून कोविन अ‍ॅपमध्ये वेळ घेऊन लसीकरणासाठी येण्याची सुविधा आहे. परंतु पालिकेच्या लसीकरण केंद्रावर वेळ घेतलेले आणि नोंदणी न केलेले एकाच रांगेत ताटकळत ठेवले जाते. वेळ घेऊनही

अनेकांना लस मिळत नसल्याचे दिसते आहे.

* माझ्या आईवडिलांच्या लसीकरणासाठी अ‍ॅपमध्ये कांदिवली शताब्दी रुग्णालयाची ९ ते ११ वेळ घेतली होती. रुग्णालयाने मात्र याबाबत माहिती नाही असे सांगून रांगेतच उभे राहण्याची सूचना केली, असे सिद्धांत वकील यांनी सांगितले. केंद्रावर याबाबत कोणीही दाद देत नसल्याने अखेर पालिकेच्या ट्विटर हँडलवर अनेकांनी समस्या मांडल्या आहेत.

* दहिसर करोना केंद्रावर लसीकरणासाठी मंगळवारी साडे सात वाजता गेलो होतो. परंतु साठा संपल्याने लसीकरण झाले नाही. म्हणून बुधवारी चारकोपच्या प्रसूतिगृहातील केंद्रावर गेलो तर तिथेही २५ मात्रा मिळाल्या होत्या. त्यामुळे लस मिळालीच नाही, असे ज्येष्ठ नागरिक सुशीलकुमार यांनी सांगितले.

नागरिक संतप्त

वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) लसीकरण केंद्रावर बुधवारी मोठी गर्दी उसळली. केंद्रावर अंधेरी, जोगेश्वरी, शीव, चुनाभट्टी, चेंबूर, दादर ते अगदी कल्याणहूनही नागरिक लसीकरणासाठी आले होते. नागरिकांच्या गर्दीपुढे पालिकेने उभे केलेले मोठे मंडपही कमी पडले. उन्हाचा कहर आणि  पुढे न सरकणाऱ्या रांगा यांमुळे नागरिक संतप्त झाले होते. लसीकरणास उशीर होत असल्याने वाद सुरू झाले. काही नागरिकांनी केंद्रांवरील कर्मचाऱ्यांवर हात उगारण्याचाही प्रयत्न केला. पहिली मात्रा घेणारे, दुसरी मात्रा घेणारे आणि वयोवृद्ध असे वेगवेगळ्या रांगांचे नियोजन केले असले तरी गर्दी वाढल्याने सारे नियोजन कोलमडून गेले. नागरिक कर्मचाऱ्यांच्या, पोलिसांच्या अंगावर ओरडत होते, तर काहींवर अगदी ‘पैसे घ्या पण आम्हाला आत जाऊ द्या’ अशी गयावया करण्याचीही वेळ आली. वरळीतील पोद्दार रुग्णालयातही ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होती. तेथे ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि नोंदणी न केलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या नागरिकांचे लसीकरण सुरू होते.