20 September 2020

News Flash

महापालिका कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची जबाबदारी

पोलिओची लस देण्यासाठी बाळांना कसे हाताळायचे याची चिंता

पोलिओची लस देण्यासाठी बाळांना कसे हाताळायचे याची चिंता

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईमध्ये करोनाबाधित आणि संशयित रुग्णांच्या शोधमोहिमेवर असलेले पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांवर आता शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील मुलांना पोलिओची लस देण्याची जबाबदारी सोपविण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. सध्या घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करून बाधित-संशयित रुग्णांचा शोध घताना करोनाची बाधा होण्याची टांगती तलवार डोक्यावर असताना आता पोलिओची लस देण्यासाठी तान्ह्य़ा बाळांना कसे हाताळायचे असा प्रश्न या मंडळींना पडला आहे. तर मंदिरांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी राबविण्यास काही मंदिरांनी विरोध दर्शविला आहे.

करोना निर्मूलनासाठी नागरिकांची तपासणी आणि रुग्णांच्या शोधमोहिमेमध्ये पालिकेच्या आरोग्य खात्यातील समन्वयक, साहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) आणि आरोग्य स्वयंसेविका कार्यरत आहेत. ही मंडळी इमारतींमध्ये जाऊन रहिवाशांची तपासणी करीत आहेत. आता पालिके ने त्यांच्यावर तान्ह्य़ा बाळापासून पाच वर्षांच्या मुलांपर्यंत सर्वाना पल्स पोलिओची लस देण्याचे काम सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. २० सप्टेंबरपासून आठवडाभर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

या कामाबद्दल आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. काही विभागांतील या मंडळींची करोनाविषयक चाचणी करण्यात येणार असून करोनाची बाधा नसलेल्यांनाच हे काम देण्यात येणार असल्याचे संबंधित पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर काही ठिकाणी करोनाविषयक चाचणी करण्यात येणार नाही, असे संबंधित कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांना सांगण्यात आले आहे. हातमोजे, मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर करत असलो तरी लहान मुलांना हात कसा लावायचा असा प्रश्न या सर्वाना पडला आहे.

पालिका शाळा, मंदिर, इमारतींचे प्रवेशद्वार, पालिका विभाग कार्यालय, पालिका दवाखाना अथवा पदपथावर टेबलची व्यवस्था करून लहान मुलांना पोलिओ लस दिली जाते. करोनामुळे पालिका शाळा, मंदिरे बंद आहेत. पालिका कार्यालय, दवाखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण येत-जात असतात. टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केल्यामुळे रस्त्यांवरही वर्दळ वाढू लागली आहे. लसीकरण मोहिमेसाठी काही ठिकाणची मंदिरे खुले करण्यास संबंधित व्यवस्थापनाने नकार दिला आहे. अशा परिस्थितीत पालिके ला लसीकरणाचे आव्हान पेलायचे आहे.

‘करोनावरील नियंत्रणानंतर मोहीम राबवावी’

सध्या अनेक इमारतींमध्ये अन्य व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत असल्याने तूर्तास पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवू नये. करोनासंसर्गावर नियंत्रण मिळाल्यानंतर लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे. तर आरोग्य स्वयंसेविका मार्चपासून काम करीत आहेत. आता त्यांच्यावर ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि पल्स पोलिओ लसीकरण यांचे काम सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना एका वेळी एकच काम द्यावे, अशी मागणी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 1:55 am

Web Title: vaccination responsibility on mumbai municipal employees zws 70
Next Stories
1 कर्तृत्ववान, प्रेरणादायी नवदुर्गाचा शोध
2 २० हजारांहून अधिक पोलिसांना संसर्ग
3 दोन दिवसांत अंतिम निर्णय
Just Now!
X