|| शैलजा तिवले

१८ ते ४४ वयोगटातील वलयांकित व्यक्तींचीही वर्णी

मुंबई : लस तुटवड्यामुळे राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित केले असताना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात मात्र या वयोगटातील वलयांकित व्यक्ती आणि अन्य खास पाहुण्यांना सर्रास लस टोचली जात आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अशी त्यांची नोंदणी करून हे लसीकरण केले जात आहे.

मुंबईत सर्व केंद्रांवर बुधवारी केवळ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू होते. मात्र सेव्हन हिल्समध्ये अगदी १८ वर्षांचे तरुणही लस घेत असल्याचे आढळले. तीन दिवसांपूर्वी २५ वर्षांची अभिनेत्री सारा अली खान हिनेही याच रुग्णालयात लस  घेतल्याचे सांगण्यात येते. राज्यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांचे लसीकरण होऊ शकलेले नाही. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करून जोखमीच्या गटांतील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारने खरेदी केलेल्या सुमारे तीन लाख लशींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु ‘सेव्हन हिल्स’मध्ये गेल्या काही दिवसांत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे सर्रास लसीकरण सुरू आहे. ‘वरिष्ठांची शिफारस घेऊन ही मंडळी येतात. त्यांचे लसीकरण करण्याचे आदेश असल्यामुळे आमचाही नाइलाज असतो’, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

वलयांकित व्यक्ती तर येतातच, याशिवाय राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याने खास पाहुण्याची वर्णीही लसीकरणासाठी लावली जात आहे. याविषयी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.

तन्मय फडणवीसही!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यानेही लशीची पहिली मात्रा सेव्हन हिल्स रुग्णालयात घेतली होती. त्यावेळीही रुग्णालय प्रशासनावर आरोप झाले होते. त्याने अत्यावश्यक कर्मचारी म्हणून अ‍ॅपमध्ये नोंदणी केली असण्याची शक्यता आहे. प्रत्येकाची पडताळणी करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले होते.

हे सारे कसे होते?

येथील दुसऱ्या मजल्यावरील कक्ष १० हा ‘खास पाहुण्यां’साठीच सज्ज केलेला आहे. तेथे येणाऱ्यांची अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अशी नोंदणी करण्यात येते, असे सांगितले जाते. ‘मॅडमनी सांगितले आहे, सरांनी पाठवले आहे,’ असे सांगत ४५ वर्षांखालील ‘खास पाहुणे’ या कक्षात बुधवारी लस घेताना आढळले. तेथे कोणत्याही व्यक्तीची नोंदणी ‘कोविन’वर केली जात नाही. एका कागदावर ‘खास पाहुण्यां’चे आधार क्रमांक, नाव आदी तपशील भरून घेतले जातात. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांची एकत्रित नोंदणी अ‍ॅपमध्ये केली जाते.

साठेबाजांबाबत न्यायालय आक्रमक…

मुंबई : प्राणवायूची मागणी व पुरवठ्याच्या आकडेवारीमधील तफावत, रेमडेसिविरचा साठा राजकीय व तारांकित व्यक्तींकडे सापडत असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याच्या मुद्द्यांवरून उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र व राज्य सरकारला फटकारले.