02 March 2021

News Flash

सावध सुरुवात!

राज्यात पहिल्या दिवशीचे लक्ष्य २८,५०० करोनायोद्धे

(संग्रहित छायाचित्र)

आजपासून देशभर लसीकरण मोहीम; राज्यात पहिल्या दिवशीचे लक्ष्य २८,५०० करोनायोद्धे

परिणामकारकता सिद्ध झालेली ‘कोव्हिशील्ड’ लस घ्यावी की चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील ‘कोव्हॅक्सिन’ घ्यावी, अशी संभ्रमावस्था आणि लस घेणे ऐच्छिक, परंतु लस निवडण्याच्या अधिकाराचा मात्र संकोच अशा वातावरणात आज, शनिवारपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सावधपणे सुरुवात होणार आहे.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी दोन लशींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेली आणि ‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशील्ड’ लशीने तिन्ही मानवी चाचण्या पूर्ण केल्या आहेत, परंतु भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. ‘कोव्हिशील्ड’ची परिणामकारकता ७० टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु ‘कोव्हॅक्सिन’च्या परिणामकारकतेचे निष्कर्ष अद्याप प्रतीक्षेत आहेत. शिवाय, सरकारने एकीकडे लस घेणे ऐच्छिक आहे, असे स्पष्ट केले आहे, पंरतु लस निवडण्याचे स्वातंत्र्य मात्र दिलेले नाही. देशभर पहिल्या दिवशी देशभर सुमारे तीन लाख करोना योद्धय़ांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. लसीकरणासाठी १०७५ हा मदतसेवा क्रमांक २४ तास कार्यरत असेल.

दरम्यान, राज्यात शनिवारी २८५ केंद्रांवर करोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईत कूपर रुग्णालयात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता होईल. त्यानंतर राज्यातील २५८ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात होईल. राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील वांद्रे-कुर्ला करोना आरोग्य केंद्रात करणार आहेत. दररोज सकाळी नऊ ते पाच या वेळेत लसीकरण के ले जाईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील तीन कोटी करोना योद्धय़ांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पन्नाशीवरील व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येईल. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील करोनायोद्धांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. मात्र, सामान्यांच्या लशींच्या खर्चाबाबत सरकारने अद्याप स्पष्टीकरण केलेले नाही.

देशात शनिवारपासून सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणासाठी ३१ तारीख निश्चित केली आहे.

निवडणूक आयोगाची मदत

करोना लसीकरणासाठी निवडणूक आयोग सरकारला लाभार्थीची ओळख पटवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवरची माहिती पुरवण्यास तयार आहे, पण आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरण संपल्यानंतर ही माहिती नष्ट करावी, अट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अजय भल्ला यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून लसीकरणासाठी ५० वर्षांवरील मतदारांची मतदान केंद्रनिहाय माहिती उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली होती.

महाराष्ट्रात, देशात..

– राज्यात २८५ केंद्रांवर, तर देशभर ३००६ लसीकरण केंद्रे

– राज्यात २८,५०० तर देशात तीन कोटी करोना योद्धय़ांना लस

– प्रत्येक केंद्रावर दररोज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

– ‘कोव्हिशील्ड’च्या एक कोटी १० लाख मात्रा उपलब्ध

– ‘कोव्हॅक्सिन’च्या ५५ लाख मात्रा उपलब्ध

लस कुणाला देऊ नये?

– लशींच्या चाचण्यांमध्ये स्तनदा माता आणि गर्भवतींना समाविष्ट केले नसल्याने त्यांना लस देऊ नये असे केंद्रीय आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या नियमावलीत स्पष्ट केले आहे. लस केवळ १८ वर्षे किंवा त्यावरील व्यक्तींसाठीच आहे.

– इंजेक्शन, लस किंवा कोणत्याही औषधांमुळे किंवा खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असलेल्यांना लस देऊ नये. लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर प्रतिकूल प्रतिक्रिया किंवा अ‍ॅलर्जी प्रतिक्रिया आल्यास अशा व्यक्तींनाही लस देऊ नये.

– ज्या लशीची पहिली मात्रा दिली असेल, त्याच लशीची दुसरी मात्रा द्यावी. लस घेतल्यानंतर अन्य लशी घ्यायच्या असल्यास १४ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.

.. यांना बरे झाल्यावर लस

करोनाचे सक्रिय रुग्ण, उपचारादरम्यान रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) दिलेले रुग्ण आणि कोणत्याही प्रकारच्या आजारामुळे अस्वस्थ वाटणारे रुग्ण किंवा प्रकृती ठीक नसल्यास अशा व्यक्तींना बरे झाल्यावर चार ते आठ आठवडय़ांनी लस द्यावी. कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव, प्लेटलेटसंबंधीचा आजाराचा इतिहास असलेल्या रुग्णांना लस दिल्यानंतर विशेष काळजी घ्यावी.

..यांना लस द्यावी!

करोना संसर्गातून बरे झालेले, मधुमेह, हृदयविकार, मेंदू विकार यासारखा कोणताही तीव्र आजार किंवा सहव्याधी असलेले. एचआयव्हीसारख्या कोणत्याही आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण.

कोव्हिशील्ड

– एका कुपीत १० मात्रा

– साठवणुकीसाठी तापमान २ ते ८ अंश सें.

संभाव्य सौम्य दुष्परिणाम – लस दिलेल्या ठिकाणी वेदना, डोकेदुखी, थकवा, मळमळ, स्नायूदुखी, ताप, थंडी वाजणे, सांधेदुखी.

कोव्हॅक्सीन

– एका कुपीत २० मात्रा

– साठवणुकीसाठी तापमान २ ते ८ अंश सें.

संभाव्य सौम्य दुष्परिणाम – लस दिलेल्या ठिकाणी वेदना होणे, सूज येणे, डोकेदुखी, थकवा, ताप, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, घाम येणे, सर्दी, खोकला, चक्कर येणे, अंग थरथरणे.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे सकाळी १०.३० वाजता करतील. त्याचे प्रक्षेपण सर्व लसीकरण केंद्रांवर करण्यात येईल. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभी लशींचा पुरवठा आणि वितरणासाठी तयार केलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

लस ठरवण्याचा अधिकार नाही!

लस घेणे अनिवार्य नाही, ते ऐच्छिक आहे. म्हणजे लस घ्यायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, परंतु कोणती लस घ्यायची याचे स्वातंत्र्य तुम्हाला नाही. तुम्ही सीरम संस्थेची ‘कोव्हिशील्ड’ लस घ्यायची की भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ हे सरकार ठरवणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:23 am

Web Title: vaccination starts across the country from today abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 २७ जानेवारीपासून शाळा सुरू
2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी कोविड लसीकरणाचा उद्या शुभारंभ
3 अभिनेत्री करिष्मा कपूरने खारमधील फ्लॅट १०.११ कोटींना विकला
Just Now!
X