मुंबई आणि महानगर परिसरासह राज्यभर अनेक ठिकाणी करोना लशींचा साठा संपल्याने गुरुवारी लसीकरण ठप्प झाले. काही भागांत एक दिवस आणि जेमतेम तीन-चार दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. लशीची पहिली मात्रा घेतलेल्या अनेकांना दुसरी मात्रा घेण्यासाठी लसच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

मुंबई शहरातील ७१ पैकी २५ खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवरील लससाठा संपल्याने तेथे गुरुवारी लसीकरण स्थगित करावे लागले. उर्वरित केंद्रांवर लसीकरण सुरू असून तेथेही एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मुंबई शहरात महापालिका आणि राज्य सरकार यांच्यातर्फे ४९ आणि खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व केंद्रांवर दररोज सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. सध्या एक दिवसाचा साठा असल्याने शुक्रवारी लसीकरण होऊ शकेल. पंरतु, लशींचा पुरवठा न झाल्यास शनिवारी लसीकरण मोहीम ठप्प होईल, अशी परिस्थिती आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण के ले जाते. अनेकदा दोन लाखांपर्यंतच लस मात्रांचा साठा उपलब्ध असतो. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ६० हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण के ले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी यापूर्वीच लस तुटवड्याबाबत भीती व्यक्त केली होती.

मुंबईतील सायन रुग्णालयासह २७ लसीकरण केंद्रे गुरुवारी बंद ठेवण्यात आली होती. मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर गुरुवारी १ लाख ३० हजार लोकांचे लसीकरण झाले. आता केवळ ४०० लोकांना पुरेल इतकाच साठा बीकेसी केंद्रावर आहे. धारावी येथील लसीकरण केंद्रावर १५ दिवसांत अंदाजे चार हजार लोकांचे लसीकरण झाले. गुरुवारी येथील साठा समाप्त झाला. अंधेरीतील कुपर रुग्णालयात आजवर ४३ हजार लोकांचे लसीकरण झाले. आता तेथे एक दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. दिवसाला जवळपास एक हजार लोकांचे लसीकरण तेथे होत होते. जे. जे. रुग्णालयात कोव्हॅक्सीन लशीचा पहिली मात्रा देणे थांबवण्यात आले आहे. केवळ दुसरी मात्रा देण्यात येत आहे. जम्बो लसीकरण केंद्रावर दिवसाला दोन ते अडीच हजार लोकांचे लसीकरण केले जाते. तेथेही दोन दिवसांचाच साठा आहे.

ठाण्यात पाच दिवसांचाच साठा

ठाणे : ठाणे जिल्ह््यात लशीच्या १ लाख २३ हजार ८४० मात्रा शिल्लक आहेत. ठाणे शहरात दोन दिवस, कल्याण-डोंबिवलीत दोन ते तीन दिवस, भिवंडी आणि बदलापूरमध्ये पाच दिवस, अंबरनाथमध्ये एक दिवस आणि ग्रामीण भागात पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. नवा साठा आला नाही तर जिल्ह््यात लसीकरण मोहीम थांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पालघरमध्येही टंचाई

पालघर/ वसई : पालघर जिल्ह्याातील लशींचा साठा शुक्रवारी संपण्याची चिन्हे आहेत, तर वसई-विरार महापालिकेकडेही जेमतेम तीन दिवस पुरतील इतक्याच लशीच्या कुप्या शिल्लक आहेत. परिणामी गुरुवारी जिल्ह्याातील सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी आणि लशीचा तुटवडा असे चित्र होते.

रत्नागिरीत लसीकरण थांबविले

रत्नागिरी : जिल्ह््यात लशीचा तुटवडा निर्माण झाल्याने नियमित लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाला लशीच्या १ हजार १०० नवीन मात्रा मिळाल्या आहेत. मात्र लशीची दुसरी मात्रा घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी त्या राखून ठेवल्या आहेत. त्यामुळे पहिली मात्रा घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.  दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले की लशीचा तुटवडा असल्याने जिल्ह््यात नियमित लसीकरण बंद केले आहे. आता दोन दिवसात लसीच्या आणखी मात्रा उपलब्ध होणार आहेत.

 

रायगडमध्ये तुटवडा

अलिबाग : रायगड जिल्ह््यात करोना प्रतिबंधक लशीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. २५ केंद्रांवरील लसीकरण थांबविण्यात आले आहे. जिल्ह््यात ७५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यात ६४ शासकीय तर ९ खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह््यात केवळ ३ हजार ७८० मात्रा शिल्लक आहेत.

पुण्यात मर्यादित

पुणे : शहरासह जिल्ह््यात केवळ गुरुवारपुरताच (८ एप्रिल) लशींचा साठा शिल्लक होता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुण्यात लशींचा साठा मर्यादित असल्याने क्षमता असूनही लसीकरण करताना अडचण येत आहे. त्यामुळे पुण्यात मागणी असेल तेवढा लशींचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापुरातही लशींच्या साठ्याची स्थिती चिंताजनक आहे. या विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह््यातील लशींचा साठा गुरुवारी संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. तर सोलापूरमध्ये गुरुवारी २१ हजार लशींचा साठा असून तोही जेमतेम दोन दिवस पुरण्याची चिन्हे आहेत.

विदर्भातील दोन जिल्ह््यांत साठा समाप्त

नागपूर: विदर्भातील यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह््यात लशींचा साठा संपला आहे. तेथे गुरुवारी लसीकरण झाले नाही. नागपुरातही कोव्हॅक्सिनचा साठा संपला, परंतु कोविशिल्डचा शिल्लक आहे. इतर जिल्ह््यांत १ ते चार  दिवस पुरेल एवढाच साठा आहे. नागपूर शहरातील गुरुवारी ठिकठिकाणी लस घेण्यासाठी रांगा दिसून आल्या. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने केंद्रावर कोविशिल्ड लस देण्यात आली. नागपुरात  ७ एप्रिलला ६२,०९७ कोविशिल्ड तर ग्रामीणमध्ये २७,८०७ लसींचा साठा आहे. नागपुरात चार दिवस, तर गडचिरोली, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशिमला दोन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.

मराठवाड्यात लसीकरणच कमी

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह््यांमध्ये लसीकरणासाठी अपेक्षित लोकसंख्येच्या केवळ आठ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून औरंगाबाद आणि नांदेड या दोन जिल्ह््यांत हे प्रमाण दहा टक्के एवढे आहे. मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत लस उपलब्ध झाली नाही तर लसीकरण केंद्रे बंद करावी लागतील अशी स्थिती आहे. औरंगाबाद जिल्ह््यासाठी नव्याने ९ लाख ५० हजार लशींची मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासाठी २८ लाख २९ हजार २८० लस मात्रा आवश्यक असल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. ज्या शहरात अधिक प्रसार त्या शहरात लसीकरणासाठी रांगा लागत आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड शहराचा समावेश आहे.

नाशिक विभागात पाच दिवसांचाच साठा

नाशिक : नाशिक विभागात केवळ चार ते पाच दिवस पुरेल एवढाच साठा. विभागाला आतापर्यंत एकूण १२ लाख ६९ हजार ३०० मात्रा मिळाल्या. त्यातील जवळपास १० लाख मात्रा वापरण्यात आल्या आहेत. निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत हे प्रमाण ६३.३४ टक्के आहे.

 

लसकारणाला ऊत

राज्यात लशीचा खडखडाट असताना त्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात दावे-प्रतिदाव्यांचे राजकारण पेटले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत केंद्राकडे साठा वाढवून देण्याची मागणी केली आहे, तर महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांनाच एक कोटीहून अधिक लस मात्रा मिळाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुंबईतील साठा किती?

मुंबई महापालिकेला बुधवारपर्यंत (७ एप्रिल) १७ लाख ०९ हजार ५५० इतक्या मात्रा उपलब्ध झाल्या. त्यापैकी, १५ लाख ६१ हजार ४२० मात्रा उपयोगात आणल्या गेल्या. म्हणजेच १ लाख ४८ हजार १३० इतका साठा बुधवारी शिल्लक राहिला. शिल्लक साठ्यातील ४४ हजार ८१० इतक्या लस दुसऱ्या मात्रेसाठी राखीव आहे. म्हणजेच १ लाख ०३ हजार ३२० इतक्या मात्रा गुरुवारी ८ एप्रिल रोजी सकाळी उपलब्ध होत्या. गुरुवारी सुमारे ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी जेमतेम पुरेल इतका साठा उपलब्ध असेल, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्याला १७ लाख मात्रा देण्याचा केंद्राचा निर्णय

महाराष्ट्रात लस तुटवड्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्राने गुरुवारी १७ लाख मात्रा पाठवण्याचा निर्णय घेतला. आधी सात लाख ३० हजार मात्रा पाठवण्यात येणार होत्या, परंतु साठा संपल्याच्या तक्रारींमुळे आधीचा निर्णय सुधारण्यात आला, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लसपुरवठ्यात केंद्राचा दुजाभाव : टोपे

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला लशींच्या ४० लाखांहून अधिक मात्रा, गुजरातला ३० लाखाहून अधिक मात्रा आणि हरियाणाला २४ लाखापेक्षा अधिक मात्रा मग सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राला त्यांच्यापेक्षा अधिक मात्रा मिळणे आवश्यक आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

दुसरी मात्रा विलंबाने घेतली तरी गंभीर दुष्परिणाम नाही : डॉ. सुपे

* लशीच्या पहिल्या मात्रेनंतर तयार होणारी प्रतिपिंडे काही काळानंतर कमी होण्याचा धोका असतो. ते होऊ नये आणि रोगापासून बचाव करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रतिपिंडे शरीरात निर्माण व्हावीत यासाठी दुसरी मात्रा दिली जाते.

* ही दुसरी मात्रा काही प्रमाणात उशिरा घेतली तरी त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही, असे राज्य करोना कृती दलाचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केले.

* लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही मुखपट्टी, स्वच्छता आणि अंतर राखण्याचे नियम सर्वांना पाळायचेच आहेत. त्यामुळे विलंब होत असेल तरी नागरिकांनी शांत राहावे आणि उपलब्ध झाल्यानंतर दुसरी मात्रा घ्यावी.

* लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यास त्यात तेथील कर्मचाऱ्यांची काही चूक नाही, हे समजून घेऊन नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. सुपे यांनी केले.