पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी अर्थात ‘फ्रंटलाइन वर्कर्स’साठी कोविड लसीकरण सुरू असून त्यात पालिकेचे कर्मचारी व बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला मोफत लसीकरणाच्या तीन संधी मिळणार असून तीनही वेळेस कर्मचारी न गेल्यास त्याचे नाव मोफत लसीकरणाच्या यादीतून वगळण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड लसीकरणासाठी गठित ‘टास्क फोर्स’ची विशेष बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला उपायुक्त (आरोग्य) देवीदास क्षीरसागर, संचालक (आरोग्य शिक्षण व प्रमुख रुग्णालये) रमेश भारमल यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी वरील निर्देश दिले. सर्व खाते प्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वत: लस घ्यावी व त्यानंतर आपल्या अखत्यारीतील इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असेही काकाणी यावेळी म्हणाले. खाते प्रमुखांनी लसीकरण करतानाचे आपले छायाचित्र आपल्या खात्याचा ‘व्हाट्सअप ग्रुप’ असल्यास त्यावर शेअर करावे. जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रेरणा मिळू शकेल, असेही सुचवण्यात आले.

वाहनव्यवस्था : महापालिकेच्या एखाद्या खात्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी एकाच वेळी लसीकरणास जाणार असतील, तर त्यासाठी महापालिकेद्वारे वाहन व्यवस्था करता येऊ शकेल.