लसीकरणाबाबत केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना

करोनाची लागण झालेल्या व्यक्तींनी पूर्णत: बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिली.

लसव्यवस्थापनावरील राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने केलेल्या शिफारशीनुसार केंद्राने लसीकरणाबाबत राज्यांना नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. करोनातून बरे झालेल्या व्यक्तीने किंवा लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर करोनाची लागण झालेल्यांनी तीन महिन्यांनंतर  दुसरी लसमात्रा घ्यावी. स्तनदा मातांनाही लस घेता येईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

अन्य कोणत्याही गंभीर आजारपणामुळे रुग्णालयात, ‘आयसीयू’मध्ये दाखल झालेल्या व्यक्तीने बरे झाल्यानंतर चार ते आठ आठवड्यांनी लस घ्यावी. तसेच लसमात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी आणि करोनातून बरे होऊन ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर १४ दिवसांनंतर रक्तदान करता येईल, असे केंद्राने म्हटले आहे. गर्भवती महिलांच्या लसीकरणाच्या मुद्यावर चर्चा सुरू असून, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे केंद्राने म्हटले आहे.

देशात दिवसभरात  ४,५२९ करोनाबळी

नवी दिल्ली : देशात दैनंदिन रुग्णसंख्या घटत असली तरी मृतांमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनामुळे ४,५२९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दैनंदिन करोनाबळींचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. याच कालावधीत देशात २,६७,३३४ नवे रुग्ण आढळले. देशभरात ३२,२६,७१९ जणांवर उपचार सुरू आहेत.