News Flash

४५ वर्षांखालील लसीकरण खासगी केंद्रांवरच

महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण; पालिकेच्या २२७ प्रभागांत प्रत्येकी एक लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी

वांद्रे-कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची झालेली गर्दी.

महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण; पालिकेच्या २२७ प्रभागांत प्रत्येकी एक लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी

मुंबई : येत्या एक मेपासून सुरू होऊ घातलेले १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांतील केंद्रांमध्येच करण्याचे सूतोवाच महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. लसीकरणातील नियोजनाकरिता ही व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता असून ४५ वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण सध्या सुरू असलेल्या केंद्रांवरच होणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या प्रत्येक प्रभागात एक लसीकरण केंद्र उभारण्याचा मानसही आयुक्तांनी व्यक्त केला.

येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत १८ ते ४५ वयोगटातील ९० लाख नागरिक आहेत. या सर्वाना लशीच्या दोन मात्रा यानुसार एक कोटी ८० लाख मात्रा द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी लस साठय़ाची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण यासोबतच लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे महत्त्वाचे आहे. याबाबत पालिका सरकार आणि लस उत्पादक कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत लसीकरण मोहिमेबाबत होणाऱ्या निर्णयानुसार पालिका कार्यवाही निश्चित करेल. लसीकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन नागरिकांची गर्दी, गैरसोय होऊ नये, मोहिमेचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे चहल यांनी सांगितले.

मुंबईत सरकार आणि पालिकेची ६३, तर खासगी ७३ अशी एकूण १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. आणखी २६ खासगी रुग्णालयांकडून मान्यतेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील केंद्रांची संख्या आता ९९ इतकी होणार आहे. मुंबईतील १८ ते ४५ वयोगटांतील नोंदणी केलेल्या नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. तर शासकीय ६३ लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्यात येणार आहे. १८ ते ४५ या वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी, नागरिकांची गैरसोय होऊ  नये म्हणून असे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२२७ लसीकरण केंद्रे

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २२७ लसीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी सर्व संबंधित विभागीय साहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही सुरू करावी. विभागातील आरोग्य केंद्र (हेल्थपोस्ट) हे प्रमाण मानून संबंधित परिसरातील नागरिकांसाठी असे लसीकरण केंद्र सुरू करावेत. पुरेशी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे लसीकरण केंद्र सुरू करावेत. महानगरपालिकेच्या दवाखान्यांसह नजीकच्या खासगी रुग्णालयांना त्या लसीकरण केंद्रांशी संलग्न करावे. जेणेकरून, लसीकरणाचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यास उपचार करणे सोयीचे होईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अंधेरीत लस भांडार

पालिकेने अंधेरीमध्ये प्रादेशिक लस भांडार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लस साठवण केंद्र सुरू झाल्यावर सध्याच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस भांडारातून पूर्व उपनगरांसाठी तर अंधेरीतील केंद्रातून पश्चिम उपनगरांसाठी लस वितरण करण्यात येणार आहे.

दररोज एक लाख नागरिकांच्या लसीकरणाचा संकल्प

राज्य सरकार आणि पालिका प्रशासन लस उत्पादक कंपन्यांशी संपर्कात असून मुंबईला प्राधान्याने लससाठा मिळावा म्हणून प्रयत्न सुरूआहेत. लस साठय़ाचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत दररोज किमान एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निष्टिद्धr(१५५)त करण्यात आले आहे, असे चहल यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रांमध्ये सोमवारी दिवसभरात ६९ हजार ७५५ नागरिकांना लस देण्यात आली.

पालिकेचे आवाहन

मुंबईतील गृहनिर्माण संस्था, विविध मोठय़ा कंपन्यांनी खासगी रुग्णालयांसमवेत करार करून आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ  लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 2:43 am

Web Title: vaccination under 45 years only at private centers zws 70
Next Stories
1 सामान्यांसाठी बंद लोकलमध्ये फेरीवाल्यांची गजबज
2 वीज, नळ बिघाड दुरुस्त करणाऱ्यांची शोधाशोध
3 उत्तर मुंबईतील रुग्णसंख्येत लक्षणीय घट
Just Now!
X