२७ रुग्णालयांना माहिती देण्याचे आदेश

मुंबई : लस घोटाळाप्रकरणी कांदिवली हिरानंदानी हेरिटेजमधील नागरिकांना दिलेल्या बनावट प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या लशींच्या बॅचचा वापर कु ठे के ला त्याची माहिती देण्याचे आदेश २७ रुग्णालयांना पालिकेने दिले आहेत.

कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेजमधील जवळपास १०० नागरिकांना बनावट लस दिल्याचे समोर आल्यानंतर नानावटी, लाइफ सायन्स आणि गोरगाव नेस्को रुग्णालयाच्या नावाने बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते. यावर कोव्हिशिल्ड लशीच्या चार बॅचचे क्रमांक नमूद केलेले आहेत. या बॅचच्या लशी कोणत्या रुग्णालयांना दिल्या होत्या याची माहिती पालिकेने सीरम इन्स्टिट्यूटकडे पत्राद्वारे मागितली होती. ही माहिती इन्स्टिट्यूटने पालिकेला कळविली आहे.

‘एका बॅचमध्ये १० लाख मात्रांचा समावेश असतो. अशा चारही बॅचमध्ये समाविष्ट असलेल्या लशी कोणकोणत्या रुग्णालयांना कंपनीने पुरविल्या आहेत याची माहिती सीरमने पाठविली. त्यात देशभरातील रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबईत यातील २७ खासगी रुग्णालये आहेत. या चार बॅचच्या लशींचा वापर कोणत्या ठिकाणी केला याची माहिती पाठविण्याचे या रुग्णालयांना ई-मेलद्वारे शुक्रवारी कळवण्यात आले. या माहितीमधून लशींचा वापर नेमका कोणत्या ठिकाणी केला आणि बनावट प्रमाणपत्रे कशी तयार करण्यात आली याची पडताळणी केली जाईल’, असे पालिका उपायुक्त विश्वाास शंकरराव यांनी सांगितले.

लसीकरणासाठी वापरलेल्या लशी कोठून आणल्या, या लशी बनावट होत्या का याचा सुगावा काढण्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. या बॅचच्या लशी दिलेल्या रुग्णालयांमधून या लशी वापरल्या गेल्या की बाहेरून यांचा पुरवठा केला गेला हे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.