एटीएस ३० दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता

मुंबई : कोठडीची मुदत संपत असल्याने संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) गेल्या आठवडय़ात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) अटक केली होती. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब, स्फोटके आणि अन्य शस्त्रसठय़ासह सिमकार्ड, मोबाइल, बॉम्ब बनवण्याची आणि शस्त्र तयार करण्याची माहिती, हार्डडिस्क, डायरी आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या. आवश्यकता असेल तर तपास यंत्रणा यूएपीएअनुसार दाखल केलेल्या गुन्ह्य़ातील आरोपींच्या चौकशीसाठी ३० दिवसांची कोठडी घेऊ शकते. तसे न्यायालयाला पटवून द्यावे लागते. त्यामुळे एटीएस तिन्ही आरोपींच्या चौकशीतून उजेडात आलेली माहिती आणि तपासातील प्रगतीची माहिती शनिवारी न्यायालयाला देऊ शकेल. बॉम्ब, स्फोटके, शस्त्रसाठय़ाचा संभाव्य वापर, कट, आरोपींचे म्होरके, साथीदार याबाबत एटीएसने गेल्या आठ दिवसांत तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली. नालासोपारा, पुण्यात छापे घातले. तसेच आरोपींशी संबंधित अनेकांची चौकशी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही आरोपींची चौकशी करण्यात आल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.