मुंबईतील वैदू या अतिमागास समाजातील शाळाबाह्य़ मुले कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या मदतीने शाळेपर्यंत पोहोचली असली तरी आता जात प्रमाणपत्रांअभावी या समाजातील ६२ मुलांच्या उच्चशिक्षणात खंड पडणार आहे. मुंबईत राहण्याचा ठिकाणा नसल्याने वीजबिल, राहत्या घराचा पुरावा आदी अनेक कागदपत्रे या मुलांना जमा करता येत नाहीत. त्यामुळे, प्रमाणपत्र मिळताना अडचणी येतात. दुसरीकडे धनाढय़ कुटुंबातील मुले पैशाच्या बळावर बोगस जात प्रमाणपत्रे बनवून आदिवासी, भटक्या विमुक्तांकरिता राखीव असलेल्या जागांवर डल्ला मारत आहेत. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे ही मुले राखीव जागा बळकावत असल्याने या जागांवर अधिकार असलेली भटक्या विमुक्तांची (एनटी) मुले या प्रमाणपत्राअभावी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत.

वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे खुल्या वर्गातील विद्यार्थी कसे प्रवेश घेत आहेत, यावर ‘लोकसत्ता’ गेले काही दिवस सातत्याने वृत्ताद्वारे प्रकाश टाकत आहे. परंतु, जात प्रमाणपत्र मिळण्यास पात्र असूनही मुंबईत भटक्या विमुक्तांमध्ये मोडणाऱ्या ७०८ मुलांना विविध कारणांमुळे हे प्रमाणपत्र मिळविता आलेले नाही. तसेच, यातील ६२ मुलांकडे आर्थिक चणचण असल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लागणारे शुल्कही भरता न आल्याने शिक्षणात खंड पडला आहे, असे वैदू समाजासाठी काम करणाऱ्या दुर्गा गुडिलू या कार्यकर्तीने सांगितले.

मुंबईतील वैदू समाजातील जात प्रमाणपत्र नसलेल्या मुलांचे सर्वेक्षण सुरू असून यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था दुर्गा यांना सहकार्य करीत आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही भटके विमुक्त समाजातील शाळाबाह्य़ मुलांचा शोध घेत आहोत.

यादरम्यान आम्हाला अनेक मुलांनी दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य नसल्याचे सांगितले. किडुकमिडुक औषधांची विक्री करणे किंवा लोकलमध्ये वस्तू विकणे हे रोजगाराचे साधन असल्यामुळे महाविद्यालयातील पैसे भरणे शक्य नसल्यामुळे मुलांनी अर्धवट शिक्षण सोडले असल्याचेही दुर्गा यांनी सांगितले.

मुंबईत १४ वस्त्या

मुंबईत वैदू समाजाच्या १४ वस्त्या आहेत. जोगेश्वरी, विठ्ठलवाडी, नवी मुंबई या भागात हा समाज राहत आहे.

ही मुले दहावीपर्यंतचे कसेबसे शिक्षण घेतात.  त्यानंतर पैसे भरून शिक्षण घेता न आल्यामुळे कित्येक मुले पिढीजात व्यवसाय करतात. जातप्रमाणपत्र मिळाल्यानंतर या समाजाचा लगेच विकास होईल असे नाही, मात्र त्यानिमित्ताने विकासाच्या मार्गाने जाण्याची संधी मिळणार आहे.

– अ‍ॅड. पल्लवी रेणके, सामाजिक कार्यकर्त्यां

मी जोगेश्वरी येथे फूटपाथवर झोपडीमध्ये राहतो. यावर्षी मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. पण मला महाविद्यालयातील प्रवेश शुल्क भरणे शक्य नव्हते. मला प्रवेश प्रक्रियेसाठी खूप प्रयत्न करावे लागले. त्यात समर्थ महाविद्यालयात दीड हजार रुपये भरून मी कला शाखेत प्रवेश घेतला. जात प्रमाणपत्र नसल्यामुळे मला पैसै देऊन प्रवेश घ्यावा लागला.

– दीपक गुडिलू, विद्यार्थी