शाळाबाह्य़ मुलांच्या शिक्षणासाठी उपक्रम; तरुणांच्या पुढाकाराला ज्येष्ठांचाही पाठिंबा
जातपंचायतीला मूठमाती अभियानाला प्रतिसाद देऊन खापपंचायत बरखास्त करणारा वैदू समाज आता शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या तयारीला लागला आहे. शाळाबाह्य़ मुलांच्या शिक्षणासाठी केवळ शिक्षण विभागावर अवलंबून न राहता याच समाजातील तरुण पिढीने पुढाकार घेतला आहे. तरुणांच्या या कार्यामागे समाजातील जुनेजाणतेही ठामपणे उभे राहिले आहेत.
परंपरेने माहिती असलेल्या औषधांचा व्यवसाय करणाऱ्या वैदू समाजातील अनेक पिढय़ा शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. पदपथावर पथारी पसरून किडुकमिडुक औषधांच्या विक्रीतून पोट भरणे शक्य नसल्याने अनेक मुले शाळेत जाण्याऐवजी रोजंदारीवर काम करतात, लोकलमध्ये वस्तू विकतात, नाहीतर मग भीक मागून पैसे जमा करतात. मुलींची स्थिती तर यापेक्षाही दयनीय असून घरात लहान मुलांना सांभाळण्यात व घरातील काम करण्यात त्यांचे शालेय वय निघून जाते, अशी व्यथा दुर्गा गुडीलू मांडतात. वैदू समाजाचा विकास करायचा असेल तर मुलांनी शिक्षित होणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्याने दुर्गा गुडीलू यांच्यासोबत शरद कदम, अरविंद निगले, विभा निगले, सिरत सातपुते, निर्मला गवाणकर, केदार मकरंद आणि शाली शेख या तरुणांनी स्वयंसंघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शाळाबाह्य़ मुलांचा शोध सुरू केला.
मुंबईमध्ये वैदू समाजाच्या साधारण १४ वस्त्या आहेत आणि त्यातील सुमारे शंभराहून जास्त मुले शाळेत जात नसल्याचे आढळून आले. या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी नेमका किती खर्च येईल, याचीही माहिती या संस्थेने घेतली. प्रत्येक मुलामागे २२०० ते ६००० रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या मुलांची यादी घेऊन त्यांनी ऑनलाइन माध्यमे तसेच संस्थेमार्फत पोहोचवली. त्यातूनच आज ३५ मुलांचा खर्च उचलणारी मंडळी पुढे आली आहेत. त्यामुळे पैशाच्या अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शाळेत जाता येणार आहे.

समाजातील अनेक जण किडुकमिडुक औषधांचा व्यवसाय करीत आहेत. मात्र आता वैदू समाजातील मुलांनी जुनाट विचार बाजूला सारून शिकून मोठे व्हायला हवे आणि आपल्या समाजाचे नाव मोठे करावे, अशी इच्छा आहे.
– दुर्गप्पा शिवरलू, वैदू समाज पंच