अस्सल भारतीय ‘फॅशन’ हवी; वैशाली एस. यांचे मत
भारतासाठी फॅशनची व्याख्या वेगळीच असायला हवी. आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण करून चालणार नाही. म्हणूनच माझ्या फॅशनची मुळे ही पारंपरिक भारतीय संस्कृतीत रुजली असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध फॅशन डिझायनर वैशाली एस. यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मध्य प्रदेशातील एका छोटय़ाशा गावातून येऊन या फॅशनच्या झगमगत्या विश्वात स्वत:च्या नावाचा ब्रॅण्ड प्रस्थापित करण्यापर्यंतचा प्रवास वैशाली यांनी ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, देशातल्या अनेक छोटय़ा भागांत परंपरा व संस्कृती पाळल्या जातात. तेथील लोकांना पेहराव, आभूषणे कशी वापरायची याची माहिती असते. म्हणून मी या पारंपरिक पेहेरावसह नव्या फॅशनची व्याख्या केली. यात मी २०११ मध्ये ‘चंदेरी’ प्रकारची साडी ‘फॅशन’ म्हणून वापरली. दुर्दैवाने बाहेरून जीन्स पॅण्ट आरामदायी नसतानाही आपण घालतो. कारण ती बाहेरच्या देशातून आलेली आहे. उद्या एखाद्या बाहेरच्या डिझायनरने धोतर नव्या स्वरूपात आणले तरी आपण त्याचा स्वीकार करू, कारण आपल्या येथे पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याची सवय लागली आहे. आपल्या देशातील फॅशन वेगळी आहे. आपल्याकडे प्रत्येक २५ किलोमीटरवर कपडे घालण्याची पद्धत बदलत असते. तसेच कपडे विणण्याचे प्रकार, त्याची कला व कौशल्य यात वैविध्य आहे. अशा वैविध्य असणाऱ्या विणकरांकडे स्वत: मी गेले, त्यांच्यासोबत राहिले आणि पारंपरिक फॅशनची माहिती करून घेतल्याचेही वैशाली यांनी सांगितले.
खंत..
महाराष्ट्रात शासनाकडून विशेष सहकार्य होताना दिसत नसल्याचे वैशाली यांनी या वेळी नमूद केले. राज्यात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पैठण इथे चांगले कापड उद्योग आहेत. त्यांना आपण पुढे आणले पाहिजे. दुर्दैवाने या कापड उद्योगाला अन्य राज्यांत जितके महत्त्व दिले जाते तेवढे महत्त्व महाराष्ट्रात दिले जात नाही, अशी खंतही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

वैशाली म्हणाल्या..
* माझे लहानपण मध्य प्रदेशातील विदिशा येथे गेले. मात्र हे छोटे गाव असल्याने मुलींना स्वातंत्र्य कमी होते. त्यामुळे १८ वर्षांची असतानाच मी तेथून बाहेर पडून भोपाळ येथे गेले. मला काय करायचे हे त्या वेळी उमगले नव्हते, पण काही तरी करण्याची जिद्द मनात होती. त्यातूनच मी डिझायनिंगकडे वळले आणि मला माझे ‘लक्ष्य’ मिळाले.
* कालांतराने मी मुंबईत आले. छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या केल्या. अखेरीस बँकेतून ५० हजारांचे कर्ज घेऊन मी स्वत:च्या ब्रॅण्डची सुरुवात केली. सुरुवातीला अनेकअडचणी आल्या त्यातून सावरत, शिकत मी पुढे गेले. मी तयार केलेले कपडे घेणाऱ्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला.
* या काळापर्यंत मी फॅशन डिझायनिंगचे शिक्षणही घेतले नव्हते. या क्षेत्रात ११ वर्षे काम केल्यानंतर आणि स्वत:च्या दोन ते तीन शाखा सुरू केल्यानंतर फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

फॅशन डिझायनिंगची महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. मात्र तुमच्यात सर्जनशीलता आणि कला व कौशल्य फॅशन डिझायनर होता येणार नाही. मी फॅशन डिझायनिंग करताना त्यात नवा पर्याय शोधून काढते व रोजच्या जगण्यात आरामदायी वाटतील असे कपडे निर्माण करते. माझ्या दृष्टीने हीच फॅशनची व्याख्या आहे.
– वैशाली एस. , फॅशन डिझायनर