व्हिवा लाउंजमध्ये फॅशन डिझायनर वैशाली एस. यांच्याशी संवाद
फॅशन विश्वाच्या झगमगाटी रूपाने आपले डोळे दिपून जातात. त्या क्षेत्रातला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही आकर्षित करते. तरी या झगमगाटामागील परिश्रम, चिकाटी, जिद्द आणि धडाडीची बाजू अप्रकाशितच असते. ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाउंज’मध्ये आज, बुधवारी याच अप्रकाशित बाजूवर प्रकाशझोत पडणार आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील करिअर संधींचा मंत्रही घुमणार आहे!
अस्सल देशी वस्त्रांना फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या आणि या क्षेत्रावर स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या डिझायनर वैशाली एस. यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेमक्या कुठल्या कौशल्यांची आवश्यकता असते, या क्षेत्रात करिअरच्या किती आणि कशा प्रकारच्या संधी आहेत, आव्हाने कोणती हे या गप्पांमधून उलगडेल. फॅशनविश्वातील वातावरण, त्याबाबतचे समज-गैरसमज यावरही प्रकाश पडू शकेल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.
वैशाली एस. हा ब्रॅण्ड देशातील प्रमुख ‘फॅशन वीक’मधील एक महत्त्वाचे नाव ठरला आहे. भारतीय परंपरेतील वस्त्रांना आधुनिक शैलीतील कलात्मक रूप देणारी डिझायनर म्हणून वैशाली यांची वैशिष्टय़पूर्ण ओळख फॅशन विश्वात आहे. पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या कलात्मकतेशी नाते सांगतानाच वैशाली एस. हा ब्रॅण्ड जागतिक फॅशनमधल्या आधुनिकतेला आपलेसे करतो. वैशाली एस. या हातमाग कारागिरांनाही फॅशनचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत आहेत. पैठणी, चंदेरी अशा पारंपरिक वस्त्रांना आधुनिक रूप देत त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले आहे. वैशाली शडांगुळे मध्य प्रदेशातील विदिशामध्ये वाढलेली एक मराठमोळी मुलगी. कोणतीही पाश्र्वभूमी नसताना फॅशनविश्वातील झगमगत्या दुनियेचा एक भाग होते. वैशाली यांची ही प्रेरणादायी कथाही व्हिवा लाउंजमध्ये उलगडेल.

कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर कधी : आज
वेळ : सायंकाळी ४.४५ वाजता