समुद्रकिनाऱ्यावर प्रेमोत्सवाची बहार; सेल्फीप्रेमालाही भरते
गुलाबी गारव्याची उधळण करीत वाहणाऱ्या बेभान वाऱ्याने रविवारच्या प्रेमदिवसाला आगळी बहार आणली.. प्रेमाला वय नसतं आणि वयाचा अडसरही नसतो, या अनुभवाच्या आनंदातच संध्याकाळी सूर्य समुद्रात विसावला आणि तिन्हिसांजेसोबत सरकत जाणारा अंधार नंतर प्रेमरंगात न्हाऊ लागला..
मुंबईचे समुद्रकिनारे हे व्यक्त-अव्यक्त प्रेमाचे चिरंतन साक्षीदार असतातच. पायाशी गुदगुल्या करणाऱ्या फेसाळ लाटा तर प्रेमाच्या असंख्य आणाभाकांची साक्ष देतात. मावळतीकडे झुकणारा सूर्य, सोनेरी किरणे अंगावर खेळवत हळुवारपणे हिंदळणाऱ्या लाटा आणि प्रेमरंगाची उधळण करीत वाहणारा थंड वारा असा योग मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर दररोजच जुळून येत असतो. त्याची अनुभूती घेत असंख्य प्रेमवीर संध्याकाळी घरी परतण्याआधी या कठडय़ावर काही काळ विसावतात आणि समुद्राच्याच साक्षीने प्रेमभरल्या उद्याची स्वप्ने रंगवतात. कामाच्या दिवशीची दगदग या क्षणांनी हलकीहलकी होते आणि पिसारा फुललेली मने घरोघरी परततात. रविवारचा निवांत मुहूर्त साधून आलेला आजचा प्रेमदिवस मात्र या किनाऱ्यालाही वेगळाच भासला. मरीन ड्राइव्हपासून गिरगाव चौपाटीपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर अखंड रांगेत फुललेल्या रंगीबेरंगी गर्दीने जणू प्रेमाच्या नवनव्या रंगाची उधळणच केली.
प्रेमरंगाची ही उधळण न्याहाळण्यासाठी जमलेली गर्दी हे तर या दिवसाचे वेगळेपण होतेच, पण प्रेमाचा उत्कट उत्सव साजरा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही काहींनी आगळ्यावेगळ्या कल्पना किनाऱ्यावर सजविल्या होत्या.
प्रेमदिवस मावळल्याची हूूरहूर
संध्याकाळ सरकत गेली, समुद्रावर अंधाराचे सावट पसरत गेले, मरीन ड्राइव्हचा रत्नहार चमकू लागला, तसा या प्रेमरंगाला अधिकच बहर आला. चढत्या रात्रीबरोबर त्या रंगाची रंगत अधिकच वाढत गेली. मध्यरात्र उलटली, गर्दी पांगत गेली आणि समुद्राला पुन्हा काहीसे एकाकीपण आले. दिवसभरातील प्रेमरंगाची उधळण आठवत तो स्वत:च्याच लाटांशी खेळू लागला.