राज्यात वंचित बहुजन आघाडी नावाचा एक पक्ष उदयास आला असून त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत असल्याचे सांगत वंचित आघाडी हा पक्ष भाजपला फायदा करून देण्यासाठीच मैदानात उतरल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडले. त्याचबरोबर राज्यातील जनतेने वंचितपासून सावध व्हावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा मेळावा राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात झाला. वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदारसंघात मागासवर्गीयांबरोबरच ओबीसी व मुस्लिमांची मते लक्षणीय प्रमाणात घेतली होती. एमआयएमचे इम्तियाज जलील हे आंबेडकर-ओवेसी युतीमुळे खासदार झाले. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही वंचितमुळे मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव नाकारत उमेदवार उभे केले. त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली मते आणि जाहीर झालेले निकाल तपासल्यास वंचितने घेतलेल्या मतांचा फायदा भाजपला झाल्याचे दिसते, असे शरद पवार यांनी नमूद केले.

सत्तेत असलेले लोक देशात धर्माच्या नावाने दहशत निर्माण करत आहेत. झुंडबळीसारखा शब्द यापूर्वी कधी माहिती नव्हता. पण आजकाल सतत अशा घटना घडत आहेत. त्यातून एक धार्मिक दहशत निर्माण केली जात आहे, अशी टीका पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर केली. अशा लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात बंधुभाव राहणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. भारतातील सर्वसामान्य माणूस आणि पाकिस्तानातील सर्वसामान्य माणूस यांना भारत-पाकिस्तानमधील वैराशी काही देणेघेणे नाही. मी तीन वेळा पाकिस्तानला जाऊन आलो आहे. तेथील लोक भारतीयांशी प्रचंड आपुलकीने वागतात असा अनुभव आहे. परंतु सत्ताधारी मात्र भारत पाकिस्तानच्या नावाखाली दोन्ही देशांमध्ये वैर निर्माण करून आपला राजकीय फायदा करून घेत असल्याची टीका पवार यांनी मोदी सरकारवर केली. काश्मीरमधील ३७० कलम काढले. मग नागालँड आणि इतर सात राज्यांतील विशेषाधिकाराचे कलम का काढण्यात आले नाही, असा सवाल पवार यांनी केला.

पूरग्रस्त भागाकडे पंतप्रधानांची पाठ

राज्यात काही ठिकाणी दुष्काळ आहे, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे. लोक दुहेरी संकटात आहेत. संकटामध्ये आधार देण्याची जबाबदारी सरकारची होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुरुवातीला कोल्हापूर-सांगलीला गेले. त्यानंतर पुन्हा पाऊल ठेवले नाही. महाराष्ट्रात लातूरमध्ये भूकंप झाला होता. तेव्हा राज्याचा प्रमुख म्हणून जी जबाबदारी पार पाडली याची तपशीलवार माहिती पवार यांनी दिली. सांगली, सातारा, कोल्हापुरात एवढा मोठा पूर आल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या भागाकडे पाठ फिरवली, एकदाही पाहायला आले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.