नवे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली. आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे आंदोलन करण्यात आले.

सोमावारी २५ जानेवारीला मुंबईत डाव्या पक्षांनी पुकारलेल्या शेतकरी आंदोलनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी याच प्रश्नावर स्वतंत्र आंदोलन करण्यात आले.

मुंबईत पक्षाच्या नेत्या रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नागपडा, शिवाजीनगर, धारावी, वरळी, भायखळा, कांदिवली, चांदिवलीसह इतर भागात आंदोलन करणाऱ्या वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे आघाडीच्या वतीने सांगण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आंदोलनावर आंबेडकर यांनी टीका केली. हे दोन्ही पक्ष भाजपची ‘ए’ व ‘बी’ टीम आहेत, असा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपची ‘ए’ व ‘बी’ टीम म्हणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी मालाचे हमी भाव दुप्पट केले. अन्न महामंडळाच्या माध्यमातून कृषी माल खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ केली. त्यामुळे भारताचा शेतकरी सधन झाला. मात्र २०१९ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची ‘बी’ टीम म्हणून कोण काम करत होते, हे जनतेला माहित आहे, त्यामुळे आंबेडकर यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.