कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबईत सोमवारी  मुलुंड, घाटकोपर, गोवंडी, देवनार, चेंबूर, सिद्धार्थ वसाहत, लालडोंगर  इत्यादी दलित बहुल वस्त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीची चर्चा होती. रिपब्लिकन पक्षातील गटतट बाजुला ठेवून कार्यकर्ते उत्साहाने मतदानासाठी रस्त्यावर उतरले होते. फायदा-तोटा कुणाचा होणार आम्हाला माहित नाही, परंतु मत आमचे वंचित बहुजन आघाडीलाच, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.

मुलुंड पश्चिम येथील डंपिंग रोड, घाटकोर-रमबाई आंबेडकर नगर, गोवंडी, हा दलित बहुल वस्त्यांचा आणि आंबेडकरी चळवळीचा जोर असलेला भाग ईशान्य मुंबई मतदारसंघात येतो. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. मुंबईत सहाही मतदारसंघात आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत.

महिनाभराच्या प्रचारनंतर वंचित आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी उत्साहाने रस्यावर उतरले होते.

घाटकोपर-पूर्व येथे रमाबाई आंबेडकर नगर या वसाहतीत निवडणूक कोणतीही असो मतदानाच्या दिवशी एखादी जत्रा भरावी, तसे उत्सवाचे वातावरण असते. या वसाहतीत फेरफटका मारला असता, जागोजागी वंचित आघाडीचे कार्यकर्ते टेबल टाकून मतदारांना मतदानासाठी मार्गदर्शन करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजके कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी आवाहन करीत होते. भाजपचा एखादा टेबल किंवा झेंडाही दिवसला नाही. या वसातीत जवळपास ३० हजाराहून अधिक मतदारांची संख्या आहे. आमचा उमेदवार निवडून येईल की नाही, त्याचा फायादा कुणाला होणार, तोटा कुणाला होणार, हे आम्हाला माहित नाही, परंतु आमचे मत वंचित आघाडीला अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत होत्या.

देवनार, चेंबूर, सिद्धार्थ वसाहत, लालडोंगर ही आंबेडकरी चळवळीची प्रभावी केंद्रे असलेले विभाग दक्षिण-मध्य मुंबईत येतात. ईशान्य मुंबईच्या तुलनेत, या भागात वचिंत आघाडीचा माहोल कमी होता. गटागटाने कार्यकर्ते फिरून मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करीत होते. प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाची एकजूट केली, त्यांना बहुजन समाजाची किती प्रामाणिकपणे साथ मिळते, त्यावर आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या पक्षांचे झेंडे खांद्यावर वागवण्यापेक्षा आपल्या पक्षाचे काम करतो, याचा आम्हाला आनंद आहे, अशा कार्यकर्त्यांच्या सार्वत्रिक प्रतिक्रिया होत्या.