12 August 2020

News Flash

राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अनेक स्तरातून व्यक्त झाला निषेध

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. तसंच यावेळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलीसदेखील याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे. “मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आव्हाडांकडूनही निषेध

“राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधलं होतं. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. तसेच आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन केली आहे.

आरोपींना अटक करा – फडणवीस

“भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 10:35 am

Web Title: vanchit bahujan leader prakash ambedkar reaction on rajgruh dr babasaheb ambedkar house in mumbai jud 87
Next Stories
1 Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा
2 अरुण गवळी पुन्हा तुरुंगाबाहेर
3 “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही”
Just Now!
X