परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून त्यांना क्वारंटाइन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच आहे. आतापर्यंत २१४ विमानांनी ३२ हजार ३८३ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ११ हजार ३०५ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ११०९२ आहे तर इतर राज्यातील ९९८६ प्रवासी आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत.

राज्यात १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ५२ विमानांमधून प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिक मुंबईत उतरल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केली आहे.

ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेतसह वेगवेगळया देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले.  बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाइन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक  परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लिमिटेड  यांच्या समन्वयाने केले जात आहे. वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.