संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची मागणी

‘भारतमाता की जय’च्या आग्रही मुद्दय़ावरून देशात वादंग माजले असतानाच ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ हेच राष्ट्रगीत व्हावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केली आहे. तसेच भगव्या झेंडय़ाला राष्ट्रध्वज मानण्यात काहीच गैर नाही, अशीही भूमिका जोशी यांनी मांडली आहे. सरकार्यवाहांच्या या भूमिकेमुळे वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.

येथील दीनदयाळ उपाध्याय संशोधन संस्थेत एका कार्यक्रमात भय्याजी जोशी बोलत होते. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गाताना देशप्रेमाच्या भावना तेवढय़ा उचंबळून येत नाहीत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ हेच राष्ट्रगीत का होऊ नये, असा सवाल जोशी यांनी केला. ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताची रचना नंतर झाली. मात्र, त्याआधी ‘वंदे मातरम्’ अस्तित्वात आल्याचे जोशी म्हणाले.  राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याची निवड नंतर झाली. परंतु भगवा ध्वज त्याआधीपासून अस्तित्वात आहे, त्यामुळे भगव्याला राष्ट्रध्वज मानणे गैर ठरणार नाही, असे मत जोशी यांनी मांडले.