झपाटय़ाने नागरीकरण होत असलेल्या मध्य रेल्वेवरील वांगणी रेल्वे स्थानक अपंगस्नेही पद्धतीने विकसीत करण्याचे रेल्वे प्रशासनाने तत्त्वत: मान्य केले असून उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवरील मुंबई ते कर्जत दरम्यानच्या स्थानकांपैकी पादचारी पुल नसणारे वांगणी हे एकमेव स्थानक आहे. त्यात विरोधाभास असा की याच वांगणी गावात पश्चिमेकडे जवळपास ३५० अंध व्यक्ती राहतात. गावातील बहुतेक अंध व्यक्ती उपनगरी गाडय़ांमध्ये किरकोळ वस्तुंची विक्री करतात. त्यामुळे वांगणीतील इतर हजारो रेल्वे प्रवाशांबरोबरच या अंधांनाही रोजच जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडण्याचे दिव्य करावे लागते. काही महिन्यांपूर्वी ‘लोकसत्ता’ने वांगणीतील अंध वसाहतीतील जीवनमानावर आधारित सचित्र वृत्त दिले होते. त्यात या रोजच्या धोकादायक प्रवासाचाही उल्लेख होता. टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या विद्यार्थ्यांनी हा मुद्दा मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानुसार १२ डिसेंबर रोजी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. वांगणी स्थानकातील इतरही असुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. त्या बैठकीत एक आदर्श अपंगस्नेही स्थानक म्हणून वांगणीचा विकास करण्याचे निश्चित करण्यात आले.
अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवास करीत असलेल्या धडधाकट प्रवाशांचा प्रश्न तसेच अंध फेरीवाल्यांना गाडीमध्ये विक्री करण्यासाठी परवाने मिळण्यात येणाऱ्या अडचणीही या बैठकीत मांडण्यात आल्या. मध्य रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक जी.एस. बॅनर्जी, मुख्य अभियंता एस.पी.गुप्ता, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अतुल राणे आदी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी येथील अंध व्यक्तींना रेल्वे मार्ग ओलांडताना कोणत्या अडचणी येतात, हे दाखविणारी ‘मालगाडी शीर्षकाचा एक लघुपटही दाखविला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 3:15 am