आहे पावसाळाच; पण जणू काही डिसेंबर-जानेवारीत असतो तसा चित्र-शिल्पांचा हंगाम सध्या मुंबईत सुरू आहे. केमोल्ड, साक्षी, चॅटर्जी अँड लाल, प्रोजेक्ट ८८ या खासगी गॅलऱ्यांमध्ये तसंच वांद्रे-रंगशारदा इथली ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, वरळीचं ‘नेहरू सेंटर’, काळा घोडा भागातलं ‘आर्टिस्ट्स सेंटर’, ‘जहांगीर’ या संस्थात्मक गॅलऱ्यांमध्ये पाहण्याजोगी प्रदर्शनं सुरू आहेत. केंद्र सरकारच्या ‘एनजीएमए’मध्येही रोरिक आणि कार्मेल बर्कसन यांची प्रदर्शनं (एकाच तिकिटात) पाहायला मिळतात. असं सहसा पावसाळ्यात होत नाही.. पावसाळा असो की उन्हाळा- संस्थात्मक गॅलऱ्या कार्यरत असतातच, पण खासगी गॅलऱ्यांवर पावसाळी मांद्य चढतं. तसं यंदा झालेलं नाही.

भायखळ्याच्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’चं वर्गीकरण या खासगी, संस्थात्मक, सरकारी अशांपैकी कुठल्या प्रकारात करावं हा प्रश्नच आहे. हे संग्रहालय मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं. ‘इंटॅक’नं त्याचा कायापालट सुमारे दहा वर्षांपूर्वी केला आणि मग तस्नीम मेहता-झकारिया यांच्या पुढाकारामुळे आणि काही देणग्यांमधून याच संग्रहालयाच्या वास्तूमध्ये समकालीन (किंवा आधुनिक) कलेच्या प्रदर्शनांनाही जागा मिळू लागली. एका वेळी एका चित्रकार/शिल्पकाराला खास निमंत्रण देऊन, त्यांना संग्रहालय जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ देऊन मग त्यांनी या संग्रहालयाला दिलेल्या प्रतिसादातून तयार झालेल्या कलाकृती इथं मांडायच्या, अशी कल्पना पहिली काही र्वष चांगल्यापैकी राबवली गेली. नंतर मात्र अन्य खासगी गॅलऱ्यांकडे तयारच असलेली प्रदर्शनं इथं येऊ लागली. जागा ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’ची, म्हणून आयोजकसुद्धा हे संग्रहालयच- आणि खासगी गॅलरीचं नाव जरी इथं या संग्रहालयापुरतं खाली कुठे तरी असलं, तरी इथं प्रदर्शन झाल्यावर कलाकृती कुठेही नेणं, प्रदर्शित करणं, विकणं यांची मोकळीक त्या ‘सहयोगी’ खासगी गॅलरीलाच, असा हा राजीखुशीचा मामला. यंदा आणखी निराळा प्रकार ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’त पाहायला मिळतो आहे. दिल्लीत ‘क्रिटिकल कलेक्टिव्ह’च्या संस्थापक संचालक गायत्री सिन्हा यांनी मुळात दिल्लीच्या ‘बिकानेर हाऊस’साठी नियोजित केलेलं आणि तिथं गेल्या जानेवारीतच पार पडलेलं ‘पार्ट नॅरेटिव्हज’ हे प्रदर्शन आता निराळ्या मांडणीनिशी (पण कलाकृती त्याच!) भायखळ्यात आलं आहे.

अर्थात, ही झाली कलेची संघटनात्मक (ऑर्गनायझेशनल) बाजू. त्यात प्रत्येकाला रस असेलच असं नाही; पण प्रदर्शनामागच्या कर्तृत्वासाठी उगाच भलत्यांचं कौतुक होऊ नये, कौतुक व्हावं ते खऱ्या चेहऱ्यांचंच- अशी खबरदारी यापुढेही घेतली जाण्यासाठी एवढी प्रस्तावना. ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’तलं हे प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून, फाळणीसंदर्भातल्या आणि ‘फाळणी’चा स्वातंत्र्योत्तर काळातलाही अर्थ लावणाऱ्या आहेत. ही फाळणी ‘भारत विरुद्ध इंडिया’ अशीही असू शकते हे काही कलावंतांना जाणवलंय, असं प्रदर्शन पाहाताना लक्षात येतं. अतुल भल्ला, अनिता दुबे आणि शीबा चाछी यांच्या कलाकृती इथं लक्षणीय ठरतात. शीबा चाछी यांच्या कलाकृतींमध्ये बहुतेकदा एक संथ लयीतली हालचाल असते. ती इथल्या महाकाय कलाकृतीतही आहे. चित्रपटांच्या ‘फिल्म’ची रिळं उलगडून, अशा अनेक फिल्म (उभ्याच्या उभ्या), वर्तुळाकारात मांडून जणू मण्यांचा पडदा असतो तशाच पण फिल्म-फिल्मच्या पडद्यानं बनलेली एक वर्तुळाकार खोली चाछी यांनी इथं तयार केली आहे. या वर्तुळाला वरून आणि खालून, चाछी यांनी निरनिराळ्या दिशेनं हालचाल दिली. त्यामुळे सरळ असताना प्रचंड पिंपासारखी दिसणारी ही कलाकृती हळूहळू आकार बदलते. वर-खालच्या वर्तुळांनी पूर्ण आवर्तन घेतल्यावर, पिंपाऐवजी आता मध्यभाग अगदी बारीक असलेलं- वाळूच्या घडय़ाळासारखा आकार दिसू लागतो. हे वालुकापात्रच चाछी यांना अभिप्रेत होतं. यासाठी वापरलेल्या सर्व फिल्म फाळणीसंदर्भातल्या आहेत, हे निराळं सांगायला नकोच.

अनिता दुबे यांनी आपापली घरं सोडून बाहेरगावी गेलेल्यांचे, म्हणजे स्थलांतरितांचे किंवा काही दिवसच पाहुणे म्हणून आलेल्यांचे त्यांना नको असलेले कपडे मागून घेतले. अशा कपडय़ांना त्यांनी सलग काळा रंग दिला. त्यातून काळ्याच पण निरनिराळ्या छटा मिळाल्या. या काळ्या कपडय़ांची प्रचंड बंद दरवाजासारखी उभी रचना करून, दोन रेल्वे-रूळ आणि खडी एवढय़ाचीच जोड या रचनेला त्यांनी दिली. हे रूळ ‘ट्रेन टु पाकिस्तान’सारख्या कादंबऱ्यांची, फाळणीनं घडवलेल्या स्थलांतराची आणि त्यामागच्या हिंसाचाराचीही आठवण देतात; पण घरं तुटतात, तेव्हाही ती फाळणीच नसते का?

अतुल भल्ला हे ‘पाणी’ याच विषयाला वाहिलेलं काम नेहमी करतात. ‘मी जलसंधारक आहे आणि चित्रकारसुद्धा’ अशी स्वत:ची साभिमान ओळख सांगणाऱ्या या दिल्लीकरानं पंजाबातल्या स्वत:च्या गावाबद्दल एक गोष्ट ऐकली होती. फाळणीपूर्वी आणि नंतरही, तिथं सरकारी कचेऱ्यांत किंवा कुठल्याही सार्वजनिक जागी ‘हिंदू पानी’ आणि ‘मुस्लीम पानी’ अशी पाण्याची विभागणी केलेली असायची म्हणे. मग ही कुप्रथा तोडण्यासाठी एकत्र पाणी पिण्याचे कार्यक्रम घडवून आणण्यात आले. अतुल भल्लांनी या कुप्रथेबद्दल आज कुणाला माहिती आहे का, अशा चौकशा करत, त्यानिमित्तानं लोकांशी ‘धार्मिक विभागणी’विषयी संवाद साधत या लोकांच्या घरचे पाण्याचे उभे प्याले एकत्र केले. हे सारे प्याले एका कारंजाभोवती गोल टेबलावर ठेवून त्यांचं मांडणशिल्प तयार झालं. इथं काही उर्दू अक्षरं दिसतात. ‘पानी’ – ‘हिंदू’ – ‘मुस्लीम’ अशी ती आहेत. भल्ला सांगतात, ‘उर्दू हीच लिपी फाळणीपूर्व पंजाबात प्रचलित होती. पंजाबी हिंदू घरातल्या प्याल्यांवरली नावंही उर्दू लिपीत आहेत’. केवळ आठवणींना उजळा देऊन न थांबता, आजचे प्रश्न मांडणारी ही कलाकृती आहे.

‘जहांगीर’मध्ये सध्या जी प्रदर्शनं भरली आहेत, त्यापैकी प्रदीप कांबळे यांचं प्रदर्शन लक्षणीय ठरेल ते त्यांच्या शिल्प-विषयामुळे, विशेषत: इथल्या दोन शिल्पांमुळे. एका शिल्पात लोकलगाडीसाठी फलाटावर थांबलेली मुंबैकरांची (खरं तर उपनगरवासींची) गर्दी आहे, तर दुसऱ्या शिल्पात अशीच खचाखच गर्दी रेल्वेस्थानकातला पूल उतरते/चढते आहे. या पुलावरली एक टोपली किंवा फलाटावरल्या बॅगा आणि पर्स अशा तपशिलांकडे लक्ष पुरवणाऱ्या या शिल्पकारानं, माणसांचे तपशील मात्र मुद्दामच अस्पष्ट ठेवले आहेत.. कारण ते तुम्हीही असू शकता!

याखेरीज, कुलाब्यात रेडिओ क्लबजवळच्या ‘साक्षी गॅलरी’त लक्ष्मण राव-कोट्टूरु या तरुण शिल्पकारांचं प्रदर्शन भरलं आहे तेही अख्खं पाहण्यासारखं आहे. या प्रदर्शनातल्या एका कलाकृतीत,  जमिनीपासून भिंतीवर चढत जाणारी काळ्या मुंग्यांच्या झुंडीसारखी एक रांगेतली झुंड दिसते.. ती छोटय़ाछोटय़ा हत्तींची आहे! इथं हत्ती हा स्थलांतराचं आणि सामूहिक मानसिकतेचं प्रतीक म्हणून आला आहे.

काही निवडक शिल्पं वा मांडणशिल्पांबद्दलच आपण बोललो. या शिल्पांमध्ये गोठून राहिलेला अर्थ ‘मोकळा’ करण्याचा प्रयत्न इथं केला. तो पटला असो वा नसो.. तुम्हीही चित्रं, मांडणशिल्पं, शिल्पं, मुद्राचित्रं.. अशा अनेक प्रकारच्या कलाकृतींमध्ये गोठलेला अर्थ ‘नुसत्या नजरेनं’ वितळवू शकता!