अलीकडे बहुतांश वेळा शहरांमध्ये एकत्रितपणे साजरे केल्या जाणाऱ्या पारंपरिक सणांमध्ये उत्साही तरुण मंडळी पारंपरिक वेशभूषेत सामील होतात. यात हल्ली विशेष आकर्षण ठरते ते ढोल-ताशा पथकांचे. चेहऱ्यावर उत्साह आणि प्रचंड ऊर्जा असलेली तरुण मुले-मुली स्वागतयात्रा, मिरवणूकीत ढोल-ताशा वाजवताना पाहिल्यावर प्रेक्षकांना उत्साह येतो. मिरवणुकीत जास्तीत जास्त ढोल-ताशा वाद्यवृंदाचा सहभाग दिसायला लागल्यावर वेगवेगळ्या शहरांत तरुणांची ढोल-ताशा पथके अस्तित्वात आली. या निरनिराळ्या ढोल-ताशा पथकांचा पारंपरिक वाद्यांचा नादमयी कल्लोळ ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. विश्वास सामाजिक संस्था अणि वीरगर्जना यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात उत्सव ढोल-ताशांचा हा कार्यक्रम रंगणार आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि पुणे येथील सोळ ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. दोन दिवस ठाणेकरांना ढोल-ताशांची पर्वणी पाहायला मिळणार आहे.

कधी : २३ आणि २४ जानेवारी, वेळ : दुपारी ४ वाजता

कुठे : छत्रपती शिवाजी मैदान, जांभळी नाका, ठाणे</p>

बालन नांबियार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

धातूच्या टाकाऊ वस्तू, कांस्य, दगड आणि स्टीलला मुलामा देऊन त्यावर कलाकृती साकारण्यात माहीर असणारे बालन नांबियार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन १९ ते २५ जानेवारीदरम्यान जहांगीर कला दालनामध्ये भरविण्यात आले आहे. भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन असून यामध्ये विविध प्रकारची कलाकृती असलेली शिल्पे, मुलामा दिलेली विविध कलाकृती मांडण्यात आली आहेत. ही कला विसाव्या शतकातील प्रसिद्ध इटालियन कलाकार पावलो दी पोली याच्याकडून आत्मसात केल्याचे नांबियार यांनी सांगितले. नांबियार यांनी बनविलेल्या कलाकृती विविध म्युझियममध्ये कायमस्वरूपी ठेवण्यात आल्या आहेत. कुठे: जहांगीर कला दालन

कधी: १९ ते २५ जानेवारी

शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहण्याची सुवर्णसंधी

प्रसिद्ध कलाकारांचे शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना चालून आली असून २२ ते २४ जानेवारीदरम्यान ‘प्रयाग’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी पू.मधील एसपीजेएमआयआर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. २२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मनिपुरी, मोहिनीअट्टम आणि भारतनाटय़ाचा कार्यक्रम होणार असून अनुक्रमे अनसूया रॉय, दर्शना झवेरी, लतासना देवी, सुजाता नायर, जयश्री नायर, आनंद सच्चीदानंद आणि धनंजयन हे आपली कला सादर करणार आहेत.  दुसऱ्या दिवशी प्राणगंगा अ‍ॅम्पी थिएटर, भवन कॅम्पस तसेच श्रीनिवास जोशी आणि शुभदा यांचे ओडिसी होणार आहे.   सर्वाना प्रवेश मोफत आहे.

कुठे: एसपीजेएमआयआर सभागृह, अंधेरी पू.

कधी: २२ ते २४ जानेवारी

वाशीत ४०० विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून रचण्यात आलेल्या विविध नृत्याविष्कारांचा समावेश असलेल्या ‘शेड्स ऑफ लव्ह’ या कार्यक्रमाचे येत्या २९ जानेवारी रोजी वाशीत आयोजन करण्यात आले आहे. ‘आदिशक्ती संगीत कला केंद्र’ या संस्थेतील ४०० विद्यार्थी या कार्यक्रमात नृत्य सादर करणार असून पद्मविभूषण कथ्थक गुरू पं. बिरजू महाराज यांची या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे.

वाशीतील सिडको सभागृहात २९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास पं. बिरजू महाराज यांच्यासह प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना साश्वती सेन आणि पाश्र्वगायक मोहम्मद अझीझ हे उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे धडे देत गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबईत कार्यरत असलेल्या आदिशक्ती संगीत कला केंद्राच्या तीन संस्थांमधील ४०० विद्यार्थी या वार्षिक कला विहार उत्सवात सहभागी होणार आहेत. श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेभोवती हे विद्यार्थी नृत्य सादर करणार आहेत. त्यासाठी हे विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून सराव करत असल्याची माहिती कला केंद्राचे अतीत कुमार पांडे यांनी दिली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९९६७९६९३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘लॅमिना लाईफ’ चित्रप्रदर्शन

प्रसिद्ध चित्रकार चाऊला दोशी यांच्या दोन प्रकारच्या चित्रांचे ‘लॅमिना लाईफ’ हे प्रदर्शन २५ ते ३१ जानेवारी दरम्यान मांडण्यात येणार आहे. २५ रोजी सायंकाळी ५ वाजता अभिनेता मनोज जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

कुठे: आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी, के दुबाश मार्ग, काळा घोडा, अडोर हाऊस

कधी: सकाळी ११ ते सायं.