मुंबई : समाजासाठी विधायक कार्य करणाऱ्या नऊ जणींना ‘दुर्गा पुरस्कार’ देण्याचा सन्मान सोहळा सोमवारी रंगणार असून या निमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. यंदापासून या उपक्रमाला ‘जीवनगौरव’ पुरस्काराचाही सुवर्णस्पर्श लाभत असून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सामाजिक बदलांसाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत अढळ स्थान निर्माण करणाऱ्या नऊ दुर्गाना गेली चार वर्षे ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्काराद्वारे गौरवण्यात येत आहे. या उपक्रमाचा यंदाचा सोहळा सोमवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगणार आहे. हा पुरस्कार त्यांना न्यायमूर्ती मृदुला भाटकर, समाजसेविका प्रीती पाटकर, शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर, अभिनेत्री इला भाटे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. या सन्मान सोहळ्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि पूर्वी भावे यांचे कविता वाचन, हेमांगी कवी यांचे नाटय़ स्वगत आणि पं. अनुराधा पाल यांच्या  तबलावादनाचा कार्यक्रम हे विशेष आकर्षण असणार आहे. पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमांतर्गत या वर्षी मनोरुग्ण स्त्रियांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या डॉ. सुचेता धामणे, पॅराप्लेजिक रुग्णांना आत्मविश्वास देऊन आत्मनिर्भर करणाऱ्या सुलभा वर्दे, नदीसंवर्धनासाठी झटणाऱ्या परिणिता दांडेकर, आदिवासी स्त्रियांना हक्काची जाणीव करून देणाऱ्या कुमारीबाई जमकातन, शिक्षणक्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. स्वर्णलता भिशीकर, अत्याचाराविरोधात लढण्यासाठी स्त्रियांना बळ देणाऱ्या रुबिना पटेल, पनवेलच्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उद्योजिका मनीषा धात्रक आणि आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवणाऱ्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना ‘दुर्गा पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल. काही जागा राखीव असतील.

‘जीवनगौरव’

नवदुर्गाचा सन्मान करतानाच यंदापासून ‘जीवनगौरव पुरस्कार’ही सुरू करण्यात येत आहे. आपल्या विशेष शैलीने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना हा पहिला पुरस्कार दिला जाणार आहे.

केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा’ कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत ‘बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’, ‘एनकेजीएसबी बँक’ आणि ‘व्ही.एम. मुसलूनकर ज्वेलर्स’ असून माध्यम प्रायोजक एबीपी माझा आहेत.