News Flash

चित्रपटसृष्टीच्या शतसांवत्सरिक वर्षांनिमित्त राज्य शासनाच्या विविध योजना जाहीर

भारतीय चित्रपटसृष्टीला येत्या ३ मे रोजी १०० वर्षे पूर्ण होत असून भारतीय चित्रपटांचे शतक महोत्सवी साजरे करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने चित्रपट प्रसार, उत्कृष्ट मराठी चित्रपट

| February 3, 2013 02:34 am

भारतीय चित्रपटसृष्टीला येत्या ३ मे रोजी १०० वर्षे पूर्ण होत असून भारतीय चित्रपटांचे शतक महोत्सवी साजरे करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने चित्रपट प्रसार, उत्कृष्ट मराठी चित्रपट निर्मिती, लघुपट व माहितीपट स्पर्धा, आठ शहरांमध्ये चित्रपट महोत्सव अशा विविध योजना जाहीर केल्या आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी पत्रकार परिषदेत याविषयीची घोषणा केली.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. त्या समितीच्या शिफारशींनुसार मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर, अमरावती अशा आठ शहरांमध्ये चित्रपटांची शतकी वाटचाल दाखविणारे २१ मराठी आणि ७ हिंदी चित्रपटांचा महोत्सव भरविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून नाशिक येथून केली जाणार आहे.
दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ३० एप्रिल रोजी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा होतो. परंतु, यावर्षी २ मे रोजी होणाऱ्या चित्रपट शताब्दी सांगता सोहळ्याच्या दिवशी हा सोहळाही होणार असून कार्यक्रमाची सुरुवात फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ आणि ‘कालिया मर्दन’ या चित्रपटांतील निवडक भाग दाखवून केली जाणार आहे.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सहकार्याने भारतीय चित्रपटांच्या शतसांवत्सरिक वर्षांनिमित्त लघुपट व माहितीपट स्पर्धा जाहीर केली आहे. यामध्ये मराठी भाषेत लघुपट (४० मिनिटे कालावधी) व माहितीपट (६० मिनिटे कालावधी) बनवून २५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठवायच्या आहेत. या स्पर्धेतील १० उत्कृष्ट लघुपटांचा महोत्सव मार्च-एप्रिलमध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्य़ात आयोजित केला जाणार आहे.
वैशिष्टय़पूर्ण उपक्रम म्हणजे दर्जेदार मराठी चित्रपट  निर्मिती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) या संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी तीन दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीसोबत महामंडळाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. चित्रनगरीकडून प्रत्येक चित्रपटासाठी ५० लाख रुपयांची गुंतवणूक आणि उर्वरित गुंतवणूक निर्माता व ‘एनएफडीसी’ करतील. प्रस्ताव मागवून आठ उत्कृष्ट पटकथांची निवड करून संबंधितांची कार्यशाळा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पटकथाकारांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. आठ उत्कृष्ट पटकथांचे पटकथाकार पंधरा दिवस तज्ज्ञांसोबत राहून चर्चा करतील. त्यानंतर पटकथा लिहून घेतल्या जातील, त्याचे सादरीकरण निर्माता-दिग्दर्शकांसमोर केले जाईल आणि पुढील २-३ वर्षांत त्यावर चित्रपट निर्माण केले जातील अशी ही योजना आहे,अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 2:34 am

Web Title: various scheme declared on occasion of film industry century year
Next Stories
1 ऑनलाइन फसवणुकीचे पैसे बँकेकडून परत
2 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंडळाची समुपदेशन सुविधा
3 शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात शिक्षक-पालकांचा ‘एल्गार’
Just Now!
X