News Flash

वरवरा राव यांची तात्पुरत्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणीही राव यांनी केली आहे.

वरवरा राव

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात असलेले लेखक-कवी वरवरा राव यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत आणि करोनाचा वाढता संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर जामीन देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने त्यांना आरोग्याच्या कारणास्तव जामीन देण्यास नकार दिल्यावर ८१ वर्षांच्या राव यांनी आता उच्च न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी याचिका केली आहे. तसेच विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणीही राव यांनी केली आहे. त्यांच्यासह प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांनाही तात्पुरता जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता.

राव यांनी शनिवारी सायंकाळी आपल्याला दूरध्वनीवरून संपर्क साधला होता, असे सांगत कारागृहात त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याचा दावा राव यांच्या कुटुंबीयांनी रविवारी दूरचित्रसंवाद माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला होता. त्यानंतर राव यांच्या वकिलाने रविवारीच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करत त्यावर मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. सोमवारीही त्यांच्या वकिलाने कारागृह प्रशासनाविरोधात याचिका केली. त्यात जे. जे. रुग्णालयाने दिलेल्या निर्देशानुसार राव यांची वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच कारागृह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, राव यांच्या वैद्यकीय तपासणीचा आणि त्यानुसार त्यांना काय सुविधा दिल्या याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वैद्यकीय तपासणी

वरवरा राव यांना सोमवारी वैद्यकीय चाचण्यांसाठी तळोजा कारागृहातून जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले. चाचण्यांचे अहवाल पाहून त्यांना दाखल करून घेण्याबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील. मात्र अद्याप रुग्णालयाकडून त्याबाबत काही कळवण्यात आलेले नाही, अशी माहिती तळोजा कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:11 am

Web Title: varvara rao in the high court for interim bail abn 97
Next Stories
1 प्रत्येक पोलिसाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी
2 कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज सुरू; उच्च न्यायालयाचे केव्हा?
3 असंसदीय शब्दाबद्दल योगेश सोमण यांची माफी
Just Now!
X