सुहास बिऱ्हाडे suhas.birhade@expreesindia.com

@suhas_news

एक काश्मिरी तरुण जोडपं लग्न करून पळून मुंबईत आलं होतं. पण अचानक या दाम्पत्यावर असा आघात झाला की त्यांचं आयुष्यच कोलमडून गेलं. आपल्यावर झालेल्या या अन्यायाची वाच्यता करणंही त्यांना शक्य नव्हतं. अशा वेळी त्यांनी एक भयंकर योजना आखली..

ऑक्टोबर २०१८. मनोरच्या जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. कुऱ्हाडीने घाव घालून त्याची हत्या करण्यात आली होती. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मारेकऱ्यांनी अतिशय नियोजनपूर्वक ही हत्या केली होती. मृतदेहाची ओळखही पटत नव्हती. कोणताही पुरावा मागे ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे या हत्येतील आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं.

पालघर जिल्ह्याचा पूर्व भाग हा घनदाट जंगलाचा आहे. येथून जाणाऱ्या महामार्गाच्या आसपास घनदाट आणि निर्जन जंगल आहे. या महामार्गालगतच्या जंगलात काय घडतं त्याचा कुणाला थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे अनेकदा इथे मृतदेह आणून टाकले जातात. अशा मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या हत्येचा माग काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर नेहमीच उभं राहतं. हे प्रकरणही त्यातलंच होतं. मनोरच्या जंगलातील मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय पुढील तपास करणे शक्य नव्हते. पोलिसांनी नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील तसेच ठाणे, मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची माहिती काढली. मात्र काहीच सुगावा मिळत नव्हता.

मृतदेह सापडून दीड महिना उलटून गेला होता. पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी जागोजागी मयत इसमाची छायाचित्रे लावली होती. कुणीतरी हे छायाचित्र पाहून माहिती देईल, अशी पोलिसांना खात्री होती. झालेही तसेच. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जाताना एका व्यक्तीने एका ठिकाणी लावलेले मयत इसमाचे छायाचित्र पाहिले. मयत इसम त्याचा लांबचा नातेवाईक होता. त्याने त्वरित पोलीस ठाणे गाठले आणि मयताची ओळख दिली. सुहास धोंडे (३८) असे या मयत इसमाचे नाव होते. पोलिसांनी ओळख पटविण्याची पहिली पायरी गाठली होती. आता मारेकरी शोधायचं होतं.

सुहास धोंडे हा वसईच्या कोळीवाडय़ात राहात होता. तो एकटाच राहायचा. इस्टेट एजंटचे काम करायचा. त्याला जवळचे नातेवाईक नव्हते. काही व्यावसायिक शत्रुत्व असेल असे गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला. पण काही सुगावा लागेना. त्याच्या मोबाइलच्या कॉल्सचे तपशील (कॉल डिटेल रेकॉर्ड) पोलिसांनी तपासून पाहिले. अनेकांची चौकशी केली. मात्र काही संशयास्पद आढळले नाही. १६ ऑक्टोबरला तो बेपत्ता झालेला होता. तेव्हाचे कॉल्स पाहिले. पण नियमित फोन करणाऱ्या व्यक्तींव्यतिरिक्त कुणीच नव्हते. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वी एक काश्मिरी जोडपं त्याच्याकडे राहायला आले होते. त्यांनी पळून लग्न केलं होतं आणि आश्रयाला त्याच्याकडे आले होते. मग या काश्मिरी जोडप्याचा आणि सुहास धोंडेच्या हत्येचा काही संबंध आहे का ते पोलिसांनी तपासायला सुरुवात केली. परंतु काश्मिरी जोडपे पुन्हा काश्मीरला परत गेले होते. त्यांचा काही ठावठिकाणा इतकंच काय तर नावही माहिती नव्हतं.

हत्या झाली आणि तेही नियोजनबद्ध पद्धतीने याचा अर्थ काहीतरी गंभीर हेतू असला पाहिजे यावर पोलीस ठाम होते. त्यामुळे हेतू शोधणं गरजेचं होतं. त्याच्या नियमित संपर्कात असणाऱ्या व्यक्तींकडे पोलिसांनी पुन्हा आपला मोर्चा वळविला. तो ज्या ठिकाणी राहायचा तेथे आरिफ काझी राहायचा. दोघांची मैत्री होती. तो काहीतरी माहिती देऊ  शकेल याची पोलिसांना आशा वाटली. पोलिसांनी चौकशी केली. तर त्याने काश्मिरी जोडप्यांकडे बोट दाखवून त्यांच्यावर संशय व्यक्त केला. काश्मिरी जोडपे आश्रयाला सुहास धोंडेकडे आले होते. मात्र सुहासने त्या तरुण मुलीवर अतिप्रसंग केला होता, अशी माहिती आरिफने दिली. काश्मिरी जोडप्याचं अचानक नाहीसं होणं हे त्यांच्याकडे संशय निर्माण करत होतं. पण ते हत्या करतील याबाबत पोलीस साशंक होते. मयत सुहास धोंडेने काश्मिरी मुलीवर अतिप्रसंग केला असेल आणि बदला म्हणून तिचा पती हत्या करू शकत होता. पण जे जोडपे मुंबईतच नवीन होते, त्यांना पालघर जिल्ह्याच्या मनोर येथील जंगलाची माहिती असणे अशक्य होते. पण त्यांच्यावर आरिफ काझी का संशय व्यक्त करत होता. त्याच्या बोलण्यातून मयत सुहास धोंडेवर का एवढा राग दिसत होता, ते पाहून पोलिसांना कुठेतरी सुगावा दिसू लागला.

मग पोलिसांनी आरिफ काझीची चौकशी सुरू केली. त्याला बोलतं केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. आरिफने आपला सासरा अंकुश साने याच्या मदतीने ही हत्या केली होती. १६ ऑक्टोबरला आपल्या गाडीतून त्याला काही कामानिमित्त जायचे आहे असे सांगून सोबत नेले. त्याला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. मनोरला गाडीतच त्याची कुऱ्हाडीने हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. हत्येचे जे कारण सांगितलं ते धक्कादायक होतं.

आरोपी काझी याची अल्पवयीन मुलगी होती. मयत सुहास धोंडे रंगेल स्वभावाचा होताच. त्याने या अल्पवयीन मुलीचे अश्लील छायाचित्र आपल्या मोबाइलमध्ये काढलं होतं. जे काश्मिरी जोडपं सुहास धोंडेकडे राहात होतं, त्यांनी ही माहिती आरोपी काझीला दिली होती. त्यामुळे काझी संतापाने पेटून उठला आणि त्याने सुहासचा काटा काढण्याचा बेत आखला. सुहास धोंडे याचे कुणी नातेवाईक नाही, तो बेपत्ता झाला तरी कुणाला फारसं कळणार नाही असं त्यांना वाटत होतं. पण पोलिसांनी आरोपीला गाठलंच. पण त्यानंतर चौकशीत जे समोर आलं ते आणखी भीषण होतं.

सुहास धोंडेने आश्रयाला आलेल्या काश्मिरी तरुणीवर बलात्कार केला होता. आपलं घरदार सोडून मुंबईत पळून आलेलं हे दाम्पत्य या प्रसंगामुळे पुरतं खचून गेलं. पण सुहासवर सूड उगवणं सोपं नव्हतं. म्हणून मग त्यांनी एक योजना बनवली. त्यांनी आरिफ काझीचे कान भरले. सुहासचे तुझ्या मुलीसोबत संबंध आहेत आणि तिची अश्लील छायाचित्रं त्याच्या मोबाइलमध्ये आहेत, हे त्याला सांगितलं. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आरिफ संतापाने पेटला आणि त्याने सुहासची हत्या केली. काश्मिरी जोडप्याने अशा रीतीने आपला सूड उगवला आणि ते तेथून बेपत्ता झाले.