ज्वलनशील एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या बोगीला वसईत वायूगळती झाली. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. अग्निशमन दलाने वेळीच ही गळती थांबविल्याने पुढील अनर्थ टळला.

उरणच्या बीपीसीएल येथून एलपीजी गॅस घेऊन जाणारी मालगाडी गुजरातला निघाली होती. मालगाडी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास वसई रेल्वे स्थानाकापासून काही अंतरावर असताना एका बोगीतून गॅसची गळती होत असल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. त्याने वसई रेल्वे स्टेशन मास्तरला हा प्रकार सांगून गाडी थांबवली.यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही मालगाडी चार क्रमांकाच्या रुळावर होती. ज्या ठिकाणी बोगी थांबवली त्याच्या वरून अंबाडी रोडचा उड्डाणपूल होता. त्या ठिकाणापूसन शंभर मीटर अंतरावर इंडियन ऑईलचे रिफाईनरी सेंटर असून दोन टाक्या आहेत. तसेच लागूनच पेट्रोलपंप आहे.

घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने या परिसरातील वीज पुरवठा खंडीत केला. मोबाईल मनोरे बंद केले. हा परिसर तात्काळ निर्मनुष्य करण्यात आला. आठ नंबरच्या बोगीतून गळती झाली होती. मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होत होती. या बोगीला ६५ कंटेनर होते तर एक कंटेनर ३७ टनाचा होता. आम्ही सील तोडून वॉल बंद करून गळती थांबवली आणि अवघ्या काही मिनिटात परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असे पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यायने मोठी दुर्घटना घडली असे पालव यांनी सांगितले. हा ज्वलनशीलल वायू होता. क्षणार्धात भडका उडाला असता आणि मोठी जिवित आणि वित्त हानी होऊ शकली असती असे त्यांनी सांगितले. ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्या तज्ञांनी पुढील पाहणी केली.