वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या एकहाती वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप युतीने केला असला तरी सत्तेची हॅट्ट्रिक करण्याबाबत ठाकूर आशावादी आहेत. वसईतील दहशतवाद आणि पालिकेच्या कारभारातील गोंधळ या मुद्दय़ांवर विरोधकांनी प्रचारावर भर दिला आहे.
वसई-विरार महापालिकेचे ११५ प्रभाग असले तरी चार जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. चारही जागांवर ठाकूर यांच्या आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकूर यांच्या विरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि जनता दलाने केला होता. काँग्रेसला सर्व प्रभागांमध्ये उमेदवारही सापडले नाहीत. राष्ट्रवादी आणि ठाकूर यांचा वर्षांनुवर्षे घरोबा असला तरी यंदा राष्ट्रवादीने उमेदवार िरगणात उतरविले आहेत. जनता दालने १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना-भाजपची युती असली तरी उभयतांमध्ये धुसफूस सुरूच आहे. भाजप सरकारला ठाकूर यांच्या तीन आमदारांनी सुरुवातीला (शिवसेना सत्तेत सहभागी होण्यापूर्वी) पाठिंबा दिला होता. यातूनच भाजपने ठाकूर यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेण्याचे टाळल्याचे बोलले जाते.
  शिवसेनेचा एक विदूषक काही तरी बरळत आहे, पण वसईकर जनता त्यांना साथ देणार नाही, असा टोला ठाकूर यांनी लगावला. सत्ता असताना केलेली कामे लोकांसमोर आहेत. दिलेल्या आश्वासनानुसार करात वाढ केलेली नाही. वसई-विरार पट्टय़ातील सर्व धार्मिक आणि भाषक यांच्या पाठिंब्यावर पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला.
जनता दलाने दहशतवाद आणि निसर्गाचा ऱ्हास या दोन मुद्दय़ांवर भर दिला आहे. ग्रामीण भागात काँक्रिटचे जंगल उभारले जाऊ नये म्हणून उच्च न्यायालयात लढा देत आहोत. तसेच हा परिसर महापालिकेच्या आधिपत्याखाली आणण्यास विरोध असल्यानेच ग्रामीण भागातील प्रभागांमध्ये जनता दलाने उमेदवार उभे केलेले नाहीत, असे पक्षाचे स्थानिक नेते मनवेल तुस्कानो यांनी सांगितले.
 काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या ऑस्कर फर्नाडिस यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसने ख्रिश्चनबहुल प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
‘तर चौकशी करा’
शिवसेनेने प्रथमच ठाकूर यांना कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. वसईतील दहशतवाद संपविण्यासाठी ठाकूर यांचा पराभव करा, असे आवाहन शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले आहे. शिवसेनेने वसईतील दहशतवादाचा मुद्दा हाती घेतला आहे. गेली दहा वर्षे ठाकूर यांची सत्ता असताना महापालिकेत अनागोंदी झाल्याचा आरोपही कदम यांनी केला. शिवसेनेने दहशतवाद आणि अन्य विषय हाती घेतल्याने आमदार हितेंद्र ठाकूर आक्रमक झाले आहेत. सत्ता आहे मग महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा, असे आव्हान त्यांनी रामदासभाईंना दिले आहे.