वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारली असून, १०५ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना आणि भाजपला विजयाचा दोन अंकी आकडाही गाठता आलेला नाही. शिवसेनेचे सहा तर भाजपचा एकच उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला आहे. एकूण ११५ जागा असलेल्या वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच बहुजन विकास आघाडीने वेगवेगळ्या ठिकाणी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राहिली. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी १०० जागा जिंकू, असा विश्वास सोमवारी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात या आघाडीने १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळी आमचे तीन नगरसेवक होते. यंदा ३० पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात शिवसेनेला दोन अंकी दहा जागांचा आकडाही गाठता आला नाही. शिवसेनेचे केवळ सहाच उमेदवार विजयी झाले. कॉंग्रेसला या निवडणुकीत एका जागेवर विजय मिळवता आला आहे, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. गेल्या रविवारी वसई-विरार महापालिकेसाठी ४९ टक्के मतदान झाले होते.
अंतिम बलाबल
बहुजन विकास आघाडी – १०५
शिवसेना – ६
भाजप – १
कॉंग्रेस – १
अपक्ष – २
एकूण – ११५